छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Vinod Patil : लोकसभा निवडणुकीत माघार घेत असल्याची घोषणा मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली. महायुतीने उमेदवारी नाकारल्यावर चुकीचा निकाल लागू नये याकरता आपण उमेदवारी मागे घेत असल्याचं त्यांनी सांगितलं; मात्र अद्याप कोणाला पाठिंबा दिलेला नाही किंवा कोणाचा प्रचार करायचा हे देखील ठरवण्यात आलेलं नाही. शहराच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असं विनोद पाटील यांनी यावेळी सांगितलं.
महायुतीने नाकारली उमेदवारी : महायुतीतर्फे उमेदवारी मिळावी याकरता मराठा आरक्षणकर्ते विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती; मात्र पालकमंत्री संदिपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली. अपक्ष निवडणूक लढवण्याची आपली पूर्णपणे तयारी झालेली आहे. कार्यकर्त्यांची फौज ही मतदारसंघात काम करत आहे. आपण निवडून येऊ शकतो असा विश्वास आहे; मात्र चुकून जर निकाल विरोधात गेला तर माझ्यामुळे चुकीचा उमेदवार निवडून आला असा डाग मला लागायला नको. त्याकरता ही उमेदवारी मागं घेत असल्याचं विनोद पाटील यांनी सांगितलं.
उदय सामंत यांनी घेतली होती भेट : महायुतीतर्फे उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महिना आधी आमच्याकडून उमेदवारी घेणार का? असा प्रश्न मला विचारला होता आणि त्यामुळे मला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र जिल्ह्यात असलेले राज्यसभेचे खासदार आणि दोन आमदार यांनी माझ्या नावाला विरोध केला. सर्वे करून निर्णय घ्यावा अशी माझी मागणी होती; परंतु विरोध असल्याने मला उमेदवारी नाकारली असा आरोप विनोद पाटील यांनी केला. तर राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी सोमवारी मध्यरात्री विनोद पाटील यांच्या निवासस्थानी येऊन भेट घेतली. मुख्यमंत्री लवकरच भेट घेणार आहेत; मात्र त्यापूर्वीच उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावर आपण अर्ज मागे घेतला असं होऊ नये, याकरता आधीच आपण अर्ज मागे घेत असल्याचं विनोद पाटील यांनी सांगितलं.
हेही वाचा:
- काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्या 'त्या' विधानावरुन नवा वाद, काय आहे नेमकं प्रकरण? - Sam Pitroda On tax
- नितीन गडकरींच्या प्रचार रॅलीत शालेय विद्यार्थी; शाळा प्रशासनावर कारवाईचे आदेश, 'या' काँग्रेस नेत्यानं केली होती तक्रार - Lok Sabha Election 2024
- अमरावतीत आज राजकीय दंगल; अमित शाह यांची सभा, बच्चू कडू यांची मिरवणूक - Ravi Rana Vs Bacchu Kadu