बीड Mixed Farming Of Fruits In Beed : बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे कधी अवकाळी तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो; यावर्षी जरी पावसाने बीड जिल्ह्यावर कृपा दाखवली असली तरी मागील तीन वर्षांत मात्र शेतकरी होरपळून निघाला. त्यातच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका हा अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये येत असल्याने या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमीच असते. याच भागातील एका महिला शेतकऱ्यानं दुष्काळी परिस्थितीवर मात करून 3 एकर शेतीत 3 प्रकारच्या फळांची मिश्र पद्धतीनं लागवड करून भरघोष उत्पन्न कमविलं.
सफरचंदाची 240 झाडे लावली : शेतकरी विजया गंगाधर घुले यांनी 2016 साली सर्वप्रथम अर्धा एकर क्षेत्रावरती ड्रॅगन फ्रुट या विदेशी फळ पिकाची लागवड केली. नंतर क्षेत्र कमी असल्यामुळे त्याच क्षेत्रामध्ये खजूर आणि सफरचंद ही झाडे मिश्र पद्धतीनं लावली. ड्रॅगन फ्रुट पासून त्यांना पहिलेच लाखो रुपयांचे उत्पादन मिळाले असून त्याच क्षेत्रामध्ये खजूरची 80 झाडे आणि सफरचंदाची 240 झाडे लावली आहेत. सध्या खजूर या पिकाला उत्पन्न येण्यास सुरुवात झाली असून प्रत्येक झाडापासून पहिल्याच वर्षी 70 किलो ते 120 किलोपर्यंत फळे मिळाली. बाजारपेठेत त्याची 70 ते 100 रुपये दराने विक्री केल्या गेली. तर किरकोळ बाजारांमध्ये 160 ते 200 रुपयांपर्यंत खजूरची विक्री केली. खजूरच्या 80 झाडांपासून पहिल्याच वर्षे अडीच ते 3 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून पुढील वर्षी प्रती झाड दीडशे ते पावणे दोनशे किलो पर्यंत खजूर मिळणे अपेक्षित आहे. या क्षेत्रामधून कमीत कमी सहा ते सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल.
20 ते 25 लाखांचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा : फळांची शेती मिश्र असल्यामुळे ड्रॅगन फ्रूटचे चार ते पाच लाख रुपये उत्पन्न तसेच खजूरचे चार पाच लाख रुपये उत्पन्न असे एकाच एकरामध्ये कमीत कमी दहा लाखापर्यंत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. पारंपरिक शेती करण्यापेक्षा नवनवीन प्रयोग करून भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी खजूर किंवा ड्रॅगन सारख्या फळ पिकांची निवड करणं गरजेचं आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होऊ शकते. तीन एकर क्षेत्रापासून कमीत कमी 20 ते 25 लाख रुपये उत्पन्न मिळण्याची विजया घुले यांना अपेक्षा आहे. राज्यातील तसेच देशभरातील शेतकऱ्यांनी या शेतीकडे वळले तर त्यांनाही शाश्वत उत्पन्नाचा मार्ग मिळेल. अतिशय कमी कष्टात कसलाही रासायनिक स्प्रेचा वापर न करता शेतीतून येणारं हे उत्पन्न असल्यामुळे ते भविष्यात नेहमीच फायद्याचं ठरेल. विजया घुले यांच्या या प्रयोगाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना 2022-23 चा जिजामाता कृषी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले.
हेही वाचा :