मुंबई Vijay Wadettiwar On Government : लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानं महायुती सरकारनं आता सरकारी पैशांनी मतं खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. दोन महिन्यासाठी वाटाण्याच्या अक्षता लावून सरकारी पैशातून मतं खरेदी करण्याचा प्रयत्न जनतेनं ओळखला आहे. त्यामुळं सुरू केलेल्या या योजनांचा लाभ त्यांना मिळणार नाही, असं ते म्हणाले.
सरकारनं जनतेला लुटलं : सरकारनं अशा प्रकारे योजना आणून जनतेला आकर्षित करण्याऐवजी महागाई कमी करण्याची गरज आहे. महागाई वाढवून सरकारनं जनतेला लुटलं आहे. त्यामुळं 1500 रुपये देऊन मतं मिळणार नाहीत. 1500 देण्याऐवजी महागाई कमी करा, अशी मागणी करणारं एका महिलेनं पत्र लिहिलं आहे, ते मुख्यमंत्र्यांना दिलय, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचा निर्णय घेण्याची सद्बुध्दी सरकारला आताच निवडणुकीच्या तोंडावर कशी काय सुचली? वर्षभरापूर्वी सरकारनं हा निर्णय का घेतला नाही? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानं गेलेली मतं सांभाळण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. त्यातून काही निष्पन्न होणार नाही, असं ते म्हणाले.
मविआचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील : जालना, मराठवाडा या भागातील शेतकऱ्यांच्या शेतातून एका वर्षात साडेतीनशे डीपी चोरीला गेल्याचा आरोप त्यांनी केला. गृहखात्याचं याकडं पूर्णपणे दुर्लक्ष असून केवळ कंत्राटांवर आणि कमिशनवर सरकारचं लक्ष आहे, असा आरोप त्यांनी केला. विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करतय : पीक विम्यातून शेतकऱ्यांना 15 हजार कोटी रुपये दिल्याचा दावा करुन सरकारनं स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे. मात्र मागील दोन वर्षांत केवळ चार हजार 600 कोटी रुपये देण्यात आली आहे. हे सरकार बनवाबनवी करुन शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. बीडमध्ये एमआयडीसीमध्ये शेती केल्याचं दाखवून पीक विम्याचे पैसे उचलले गेले. हा भोंगळपणा आहे. जे खरे शेतकरी आहेत त्यांचे अर्ज फेटाळले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. सरकार लोकसभा निकालानंतर केवळ खोटे नरेटिव्ह याच मुद्द्यावर अडकून बसलं आहे. सरकारची अनास्था आणि दुर्लक्ष यामुळं शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
हेही वाचा
- "महागाईनं जनता त्रस्त, महायुती सरकार वसुलीत व्यस्त", विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी - maharashtra monsoon session 2024
- "मुंबईतील जमिनी अदानींच्या घशात...", आदित्य ठाकरेसंह विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला घेरलं! - Maharashtra Monsoon Session 2024
- जातनिहाय जनगणना केल्यास प्रश्न सुटणार : खासदार अमोल कोल्हेंचं आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य - Maratha reservation