नागपूर Navtapa Effect In Vidarbha : प्रादेशिक हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस विदर्भाला दिलासा मिळेल अशी कोणती शक्यता नसल्याचं म्हटलयं. उलट नागपूरसह विदर्भात अतिउष्णतेचा (हिट-वे) इशारा देण्यात आल्यामुळे विदर्भात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता अधिक आहे. आज चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे सर्वाधिक ४७.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर नागपुरचे तापमान ४५.६ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे तर अमरावती ४५, वर्धा जिल्ह्याचे तापमान ४५ डिग्री नोंदवण्यात आले आहे. चंद्रपूर ४४.८, गडचिरोली ४४.०, गोंदिया ४४.५, यवतमाळ ४२.२, अकोला ४२.२ आणि बुलढाणा ३९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
पुढील दोन ते तीन दिवस दिलासा नाही : गेल्या काही दिवसांपूर्वी विदर्भातील अमरावती चंद्रपूर, वर्धा, अकोला आणि नागपूर जिल्ह्यात सूर्याचा प्रकोप वाढला आहे. कमाल तापमानात
वाढ सुरू आहे. पुढील काही दिवस तापमानात अशीच वाढ कायम राहणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. पुढील दोन ते तीन दिवस विदर्भाला दिलासा मिळण्याची शक्यता देखील नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
रस्त्यावर शुकशुकाट : गेल्या चार दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे रस्त्यावरील वर्दळही कमी झाली आहे. रस्ते ओस पडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. एरवी गर्दीने फुललेले रस्ते निर्मनुष्य झाले आहेत.
विदर्भात नवतपा पेटला : आज नवतपाचा तिसरा दिवस होता. नवतापात विदर्भाची परिस्थिती अत्यंत कठीण होत असते त्याचाचं प्रत्यय आज आलाय. नवतपा म्हणजे उन्हाळ्याच्या हंगामातील सर्वात उष्ण ९ दिवस. या दिवसांमध्ये तापमान मोजणाऱ्या यंत्रावरती पारा जरी कमी दिसत असला तरी तापमान हे मात्र जास्त असते. उत्तरेकडील राज्यांमधून वाहणाऱ्या अतिउष्ण वाऱ्यांमुळे वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण होतो. नवतपा याला हवामानशास्त्रात कोणतेच स्थान नाही, म्हणजेच असा काही प्रकार मानला जात नाही. पण या नऊ दिवसांमध्ये सूर्याची किरणे थेट पृथ्वीवर पडतात. त्यामुळे तापमानात वाढ होत असते, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
या काळात असतो नवतपा : दरवर्षी "मे" महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नवतपाला सुरुवात होते. नवतपाच्या काळात पृथ्वीवरील उष्णता ही प्रचंड वाढते. हिंदू ज्येष्ठ महिन्यात नवतपा येतो. सूर्य ज्यावेळी पंधरा दिवसांकरिता रोहिणी नक्षत्रात येतो, त्यातील सुरुवातीच्या ९ दिवसाला नवतपा, असे म्हटले जाते. पावसाळ्याची दशा आणि दिशा कशी राहील हे ठरवण्यासाठी नवतपाच्या ९ दिवसांना फार महत्त्व आहे. या नऊ दिवसांमध्ये थंड वारे वाहत नसल्यास मान्सूनमध्ये पाऊस चांगला होईल. तसेच या दिवसात पाऊस आला तर मान्सूनचा प्रवास अडथळ्यांचा असतो असे म्हटले जाते.
हेही वाचा :
- महाराष्ट्रातील कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरण; न्यायालयानं 'बीएसआयएल'सह तिघांना ठरवलं दोषी - BSIL Held Guilty Coal Scam
- ताज हॉटेल आणि मुंबई विमानतळ बॉम्बनं उडवून देणार; मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला धमकीचा फोन - Mumbai Police Threat Call
- संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी कोल्हापूर महापालिका 'ॲक्शन मोडवर'; पंचगंगा नदीत केले प्रात्याक्षिके - Kolhapur News