पुणे Pooja Khedkar Case : भारतीय प्रशासकीय सेवेतून निवड रद्द करण्यात आलेल्या पूजा खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या त्यांची निवड रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. परंतु त्यांनी दाखल केलेली याचिका ही ''पूजा दिलीप खेडकर यांची की, पूजा दिलीपराव खेडकर यांची ?'' असा सवाल सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे आता या वादाला पुन्हा नवीन कलाटणी मिळाली आहे.
पुणे जिल्ह्यात प्रोबेशनरी सहाय्यक जिल्हाधिकारी राहिलेल्या पूजा खेडकर यांच्याबाबत अनेक धक्कादायक माहिती समोर आली होती. एक व्यक्ती असताना दोन नावानं दिव्यांग असल्याचं सर्टिफिकेट दाखवून यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण, त्यानंतर तब्बल सहावेळा मेडिकल टेस्टला गैरहजर आणि मग मोठी संपती असताना नॉन-क्रिमी लेयरचं प्रमाणपत्र अशी अनेक प्रकरणं पूजा खेडकर यांच्या बाबतीत पुढे आली. मात्र, असं असताना प्रशासकीय सेवेतून निवड रद्द करण्यात आलेल्या पूजा खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या उमेदवारी रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली.
पुढील परीक्षा देण्यास बंदी : पूजा खेडकर यांच्या विरोधात यूपीएससीनं मोठी कारवाई करत त्यांचं प्रशिक्षणार्थी पद रद्द केलं. तसंच पुढील परीक्षा देण्यास देखील बंदी घातली आहे. खेडकर यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावणाऱ्या कार्मिक आणि लोकतक्रार विभाग, लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, तसंच पुण्याचे जिल्हाधिकारी यांनाही याचिकेत प्रतिवादी करण्यात आलं आहे.
पूजा खेडकर यांना लवकरच अटक होणार? : पूजा खेडकर यांच्या विरुद्ध केंद्रीय लोकसेवा आयोगाने दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अटक टाळण्यासाठी खेडकर यांनी केलेली अंतरिम जामिनाची याचिका दिल्लीच्या पतियाळा हाऊस न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश देवेंद्र कुमार जांगला यांनी फेटाळली होती. आता दिल्ली पोलिसांकडून खेडकर यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणात त्यांना लवकरच अटक होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे.
हेही वाचा