छत्रपती संभाजीनगर Nitin Gadkari : "राजकारणात आज विचार शून्यतेचा प्रश्न आहे, राजकारण फक्त सत्ताकारण बनून राहिलंय," अशी खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. "आम्हाला शिवशाही आणायची आहे, महाराजांनी कधीही जातिवाद केला नाही. त्यामुळं जातीपातीच्या भिंती पडल्या पाहिजेत," अस मत व्यक्त करत आजच्या सामाजिक स्थितीबाबत नितीन गडकरी यांनी भाष्य केलं. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यात गडकरी यांनी सच्चा कार्यकर्ता हा बागडे यांच्यासारखा असावा, असं सांगितलं.
हरिभाऊ बागडे यांच्यासारखा कार्यकर्ता लाभला : "राजस्थानचे राज्यपाल असलेले हरिभाऊ बागडे यांनी सर्वात आधी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलं. नंतर आमदार, मंत्री, विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल असा प्रवास केला. राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, खासदार आणि आमदार हे पूर्व (माजी) होतात. मात्र, कार्यकर्ता कधीही पूर्व होत नाही. राजकारण म्हणजे फक्त सत्ताकारण झालंय, मात्र हरिभाऊ बागडे आयुष्यभर सत्ता दिसत नसताना चिकाटीनं राष्ट्र निर्मितीसाठी कार्य केलं. संघाला समर्पित भावनेनं कार्य केलं. त्यामुळं कार्यकर्त्याचा सत्कार महत्वाचा असतो. पद येतात जातात, स्वयंसेवक म्हणून काम करताना अनेक अडचणी होत्या. त्यावेळी अपमान होता, मानसन्मान मुळीच नव्हता. मात्र, त्यांनी त्याकाळी त्यांचं काम निष्ठेनं केलं," असं कौतुक नितीन गडकरी यांनी बागडे यांचं केलं.
कार्यकर्ता महत्त्वाचा : "नेहमी लोक येतात त्यांना पद मिळतात, त्यांना महामंडळ मिळतात, मात्र कार्यकर्ता उत्साहात असतो. आज सत्ता आहे, म्हणून ठीक आहे. पण काहीजण असे असतात ज्यांना सत्कार पण आवडत नाही. ते काम करत राहतात, असे कार्यकर्ते घडले पाहिजेत. राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही असं समजलं पाहिजे. दीनदयाल उपाध्याय यांनी बरंच लिहून ठेवलं आहे. राजकारणात समाजाला घडवायचं आहे. पंतप्रधान म्हणतात की मोठी अर्थव्यवस्था जगात आपली झाली पाहिजे. त्यासाठी कार्यकर्ता घडला पाहिजे," असं नितीन गडकरी म्हणाले.
आजचा सन्मान कार्यकर्त्यांमुळं : "राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी निस्वार्थपणानं आयुष्य जगलं. त्यांनी फक्त काम केलं आणि त्यांना पद मिळत गेली. साधी राहणी ही आमची शिकवण आहे. कठीण काळ होता, वीस वर्ष गावागावात फिरायचो, लोक दगड मारून पळवून लावायची. आज मान मिळतोय पण तो आमचा नाही तर हरिभाऊंसारख्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्याचा आहे," असं म्हणत गडकरी यांनी हरिभाऊ बागडे यांनी केलेल्या मेहनतीचं कौतुक केलं.
पद गेले की सुरक्षा जाते : "'राज नहीं समाज बदलणा है' असं म्हणत चांगल्या विचारधारा असणारं राज्य आणायचं आहे. कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता हरिभाऊ यांनी काम केलं. त्यांनी कधीही बायोडेटा छापला नाही. मी इतकी पद भूषवले मात्र त्यांनी कधीही माझ्या मतदारसंघाकडं लक्ष ठेवा, असं सांगितलं नाही. एखादं पद गेले की सुरक्षा जाते, तो तपासणीसाठी फिरणारा कुत्रा पण जातो. मात्र, कार्यकर्ता सोबत राहतो," असं नितीन गडकरी म्हणाले.