मुंबई- इस्रायलवरील हल्ल्यात संयुक्त राष्ट्राचा हात असल्याचा संशय असून, यामध्ये संयुक्त राष्ट्राचे कर्मचारी आणि शिक्षक यांनी हल्लेखोरांना मदत केल्याचा आरोप इस्रायलचे भारतातील वाणिज्यदूत कोबी शोषणी यांनी केलाय, ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. तसेच कुठल्याही परिस्थितीत लेबनॉनमधून आम्ही आमचे लोक परत आणू आणि नक्कीच विजय मिळवू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. तसेच भारताने केलेल्या समर्थनाबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केलेत.
इस्रायलवरील हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण होतंय. इस्रायल आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. वास्तविक आम्हाला शांततेत जगायचे होते आणि आमच्या शेजाऱ्यांना तशी आशा निर्माण करून द्यायची होती. परंतु मनुष्यावर अनन्वित अत्याचार आम्ही पाहिलेत आणि ज्यू लोकांनी राष्ट्राचा काळा इतिहासही पाहिलाय, असे मत इस्रायलचे भारतातील राजदूत कोबी शोषणी यांनी व्यक्त केलंय. आम्ही एक लहान देश आहोत, प्रत्येकाने आता मृत्यू जवळून पाहिलाय. इस्रायलची 19 वर्षांची मुलगी जेव्हा गाझाच्या बोगद्यात मृतावस्थेत सापडली, तेव्हा सर्वांना धक्का बसला होता, तीन वर्षांच्या मुलीलाही मारण्यात आले, तर 50 मुलांचा बळी घेण्यात आलाय. अनेक स्त्रिया मारल्या गेल्यात, अनेकांवर बलात्कार करण्यात आलेत, तर काहींचा शिरच्छेद करण्यात आल्याचं आम्ही कधीही विसरणार नाही आणि क्षमा करणार नाही, असंही कोबी म्हणाले.
संयुक्त राष्ट्राचा हल्ल्यात हात: इस्रायलवर झालेल्या हल्ल्यामध्ये संयुक्त राष्ट्राचे सेक्रेटरी जनरल, कर्मचारी आणि शिक्षक यांनी हल्लेखोरांना मदत केल्याचा आरोप शोषणी यांनी केला. तसेच युरोपियन नेत्यांवरही त्यांनी कट्टरपंथी इस्लामिक गटांना मदत केल्याचा आरोप केलाय ही एक राजकीय चूक असून, या गटांनी आमच्या शब्दांना आमचा कमकुवतपणा समजू नये, असा इशाराही त्यांनी दिलाय. इस्रायलमध्ये सध्या 74000 निर्वासित असल्याचे त्यांनी सांगितलंय.
हमास कुणालाही शेजारी नको : खरं तर हमास आता कुणालाही शेजारी म्हणून नकोय. इराणने आमच्यावर लाखो डॉलरची क्षेपणास्त्र डागलीत. स्वातंत्र्यापूर्वी आपल्याला दहशतवादी कारवायांचा फटका बसला होता. अमेरिकन निवडणुका आता होणार आहेत, मात्र बहुसंख्य देश हे इस्रायलला पाठिंबा देतात. आमच्यावरील हल्ले आम्ही मान्य करणार नाही, असंही ते म्हणालेत.
अंतर्गत वाद सर्वात महत्त्वाचा : दरम्यान, सर्वात मोठ्या अंतर्गत वादाच्या प्रश्नाचे आव्हान आमच्यासमोर आहे. आमचे काही लोक हमासमध्ये आहेत, आम्हाला त्यांना घरी परत आणायचे आहे आणि आमच्या देशातील एकता राखायची आहे. प्रत्येकाला शांतता हवी असते. मध्य पूर्वेतही आता शांततेची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.
भारताचे समर्थन आणि आभार: खरं तर या सर्व काळात भारताने इस्रायलला समर्थन दिले असून, आम्ही भारताचे आभार व्यक्त करतो. भारतात अनेक वर्षांपासून ज्यू न घाबरता राहत आहेत किंवा त्यांचा कोणत्याही प्रकारचा छळ होत नाही. ज्यू नेहमीच परंपरा पाळत आहेत. भारताकडून आम्हाला मिळणारे प्रेम आणि समर्थन अत्यंत चांगले आहे. आमची काही मूल्ये ही समान असल्याचे मानतो. जगभरात भारताचा प्रभाव आहे. हमासची सैनिकी ताकद आता जवळपास संपुष्टात आलीय, त्यामुळे हे युद्ध आम्ही निश्चित जिंकू, असा विश्वासही पंतप्रधान नेत्यानाहू यांनी व्यक्त केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा -