मुंबई - Lok Sabha election 2024 : मंगळवारी देशात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. देशपातळीवर इंडिया आघाडी आणि एनडीए या दोन्ही आघाडींनाही जनतेनं कौल दिला. राज्याचा विचार केला तर महाविकास आघाडीला लोकांनी चांगला कल दिला आहे. दरम्यान, ठाकरे गटानं नऊ जागा जिंकल्या आहेत. ठाकरे गटाची जे नऊ खासदार जिंकले आहेत, ते नवनिर्वांचित खासदार मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहेत. आज ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे विजयी खासदार संजय दिना पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. तसेच राज्यातील अन्य खासदारांनी देखील उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपावर बोचरी टीका केली.
आम्हाला कोणी हरवू शकत नाही हा भाजपाचा गैरसमज दूर
लोकसभा निवडणुकीत सगळ्यांनी प्रचंड कष्ट केलं. जिद्दीनं लढा देऊन विजय मिळवला. तुमच्या प्रेमाला कधीही दगा देणार नाही. मात्र आम्हाला कोणी हरवू शकत नाही, असा भाजपचा जो गैरसमज होता, तो देखील मतदारांनी दूर केला आहे, असा टोला शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी लगावला. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आणि मुंबई उत्तर पूर्वचे खासदार संजय दिना पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेतली. दरम्यान, उद्धव ठाकरे हे दिल्लीला जाणार आहेत.
कार्यकर्त्यांच्या पाठीवर ठाकरेंची कौतुकाची थाप
दरम्यान, विजयी उमेदवारांना ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यकर्त्यांनी पक्षासाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल कौतुकाची थाप दिली. लढाईला आता खऱ्या अर्थाने सुरूवात झाली आहे, या लढाईत चांगलं यश मिळालं. मी निमित्त असलो तरी तुमची अफाट मेहनत, जिद्द आणि चिकाटीमुळं विजय संपादन करता आला. तुमचं प्रेम, आशीर्वाद असाच पाठीशी राहू दे. तुमचं प्रेमाला कधीही दगा देणार नाही, असं सांगत ठाकरेंनी सर्वांचे आभार मानले. तसंच, आम्हाला कोणी हरवू शकत नाही, असा भाजपचा गैरसमज होता. तो देखील दूर केल्याचा खोचक टोला ठाकरेंनी लगावला.
हेही वाचा -