ठाणे Free Mobile Ambulance Service : माणूस आयुष्यात स्वतःच्या अनुभवातूनच सर्व काही शिकत असतो. याचा प्रत्यय आज ठाण्यात पाहायला मिळत आहे. रस्त्यावर, फुटपाथवर आपण अनेक बेघर माणसं कसंबसं जगताना बघत असतो. अशी माणसं जेव्हा आजारी पडतात किंवा मृत होतात तेव्हा त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी कधीकधी एखादी रुग्णवाहिकासुद्धा उपलब्ध होत नाही. (Sameer Sheikh) अनेकदा असे मृतदेह किंवा रुग्णांना वाहून नेण्यासाठी हातगाडीचा वापर करावा लागतो. अशा गोरगरिबांसाठी आता ठाण्यातील काही तरुण पुढे आले आहेत. हमराज जोशी आणि समीर शेख हे दोन युवक या सर्व परिस्थितीला पाहून यातून मार्ग काढण्यासाठी धडपडत होते तेव्हा त्यांना बाईक ॲम्बुलन्सची कल्पना सुचली. मग काय तर त्यांनी स्वतःकडचे आणि इतरांकडून मदत स्वरूपात पैसे घेतले आणि अहमदाबाद येथून जवळपास चार लाख रुपये खर्च करून ही बाईक ॲम्बुलन्स बनवून घेतली.
बाईक ॲम्बुलन्समध्ये आहे 'ही' सुविधा: ॲम्बुलन्समध्ये एक व्यक्तीला वाहून नेण्यासाठी छोटी पेटी असून त्यात पंखा लाईट तर आहेच; परंतु त्यात ऑक्सिजन सिलेंडरची देखील सोय करता येऊ शकते. मोठ्या ॲम्बुलन्स या अडचणींच्या वस्त्यांमधून फिरू शकत नाहीत. अशावेळी रुग्ण आणि मृतदेहांना वाहून नेण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो; मात्र ही बाईक ॲम्बुलन्स अत्यंत छोटी असल्यानं अरुंद जागेतूनही जाऊ शकते. त्यामुळे रुग्णांना आणि मृतदेहांना वाहून नेण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होऊ लागला आहे. हमराज जोशी यांनी आपल्या पुकार सेवा प्रतिष्ठान ट्रस्टच्या माध्यमातून 26 जानेवारी 2024 रोजी ही सेवा सुरू केली आहे. तेव्हापासून आतापर्यंत जवळपास 15 ते 20 रुग्ण त्यांनी सरकारी रुग्णालयांमध्ये पोहोचविले असून ही सेवा ते नि:शुल्क पुरवत आहेत.
स्वतः पाहिलेलं दुःख दुसऱ्यांनी पाहू नये : हमराज जोशी आणि समीर शेख यांच्यावर बालपणीच बेघर होण्याची वेळ आली. या कटू अनुभवातून गेल्यानंतर त्यांनी बाईक ॲम्बुलन्सची सेवा केवळ रस्त्यावर राहणाऱ्या लोकांसाठीच सुरू केली आहे. पुढे जाऊन याचा विस्तार वाढवण्याचा त्यांचा मानस असून लोकसहभागातूनच हे कार्य केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं. यासाठी आपण महापालिका आणि मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क केला; परंतु तिथून आपल्याला कोणतीही मदत मिळाली नाही, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा: