मुंबई Two Policemen Suspended : मुंबईतील एका रेल्वे स्थानकावर वैद्यकीय मदत न मिळाल्यानं 47 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाल्यानं दोन पोलिसांना निलंबित करण्यात आलंय. दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला रेल्वेच्या सामानाच्या डब्यात ठेवलं होतं. तिथं तो मृतावस्थेत आढळला, असं एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.
स्थानकावर एक व्यक्ती अचानक पडला : पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, मृत अलाउद्दीन मुज्जाहिद 14 फेब्रुवारी रोजी शिवडीहून ट्रेनमध्ये चढले. मस्जिद भागातील त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी रे रोड स्टेशनवर उतरले. तिथं ते एका दुकानात काम करत होते. मात्र सीसीटीव्ही फुटेजनुसार, त्यांना थोडं अस्वस्थ वाटत होतं. ते रे रोड स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर एका बेंचवर बसलेले दिसत होते. त्यानंतर ते अचानक खाली पडले. काही वेळानं पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले दोन पोलीस मुजाहिदची तपासणी करताना दिसले. त्यांनी सांगितलं की त्यांना अंमली पदार्थांचं व्यसनी वाटलं. त्यांनी त्यांना लोकल ट्रेनच्या सामानाच्या डब्यात ठेवलं.
रेल्वेच्या डब्यात माणूस आढळला मृतावस्थेत : अधिकाऱ्यानं सांगितलं की, रेल्वे पोलिसांच्या नियमित तपासणीदरम्यान दुसऱ्या दिवशी गोरेगाव स्टेशनवर रेल्वेच्या सामानाच्या डब्यात हा माणूस मृतावस्थेत आढळला. सुरुवातीला बोरिवली रेल्वे पोलिसांकडे अपघाती मृत्यूची नोंद (एडीआर) करण्यात आली. त्यांनी याप्रकरणी तपास सुरु केला. गोरेगाव स्टेशन (पश्चिम उपनगरे) ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंतच्या सुमारे 100 सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना तो माणूस रे रोड स्टेशनवर पडल्याचं आढळलं. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये, रेल्वे पोलीस हवालदार विजय खांडेकर आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे पोलीस कर्मचारी महेश आंदळे हे त्या व्यक्तीला उचलून वैद्यकीय मदत देण्याऐवजी ट्रेनच्या सामानाच्या डब्यात टाकताना दिसत आहेत, असं या अधिकाऱ्यानं सांगितलं.
पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर निलंबित : शवविच्छेदनाच्या अहवालानुसार त्या व्यक्तीचा मृत्यू ब्रेन हॅमरेजमुळं झाला होता. अधिकाऱ्यानं सांगितलं की, त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि 19 वर्षांचा मुलगा असून तो शिवडी परिसरात राहतो. पोलिसांनी वेळीच त्या व्यक्तीला वैद्यकीय सेवा पुरवली असती तर त्याचे प्राण वाचू शकले असते. दोन्ही कर्मचाऱ्यांना गुरुवारी निलंबित करण्यात आले. त्यांना निष्काळजीपणा आणि इतर तरतुदींमुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल भारतीय दंड संहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचंही अधिकाऱ्यानं सांगितलं.
हेही वाचा :