पिंपरी-चिंचवड Homeless Football World Cup : कोवळ्या वयात नकळत हातून झालेल्या चुका.. चार भिंतीच्या आत कोंडलेले हसण्या बागडण्याचे दिवस.. परिणामी निराशेच्या गर्तेत अडकलेले बालपण.. अशा बालपण हरवलेल्या व्यसनाधीन विधिसंघर्षित बालकांसाठी पिंपरी चिंचवड शहरातील संदेश बोर्डे हे आशेचा किरण ठरत आहेत. या बालकांच्या आयुष्याला मोठी कलाटणी देण्याचं काम संदेश बोर्डे यांच्या हातून घडत आहे. शहरभरातील बालगुन्हेगारीत अडकलेल्या विधिसंघर्षित मुलांच्यात खेळाची आवड निर्माण करुन त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फुटबॉलपटू घडून आज भारताच्या वतीनं देशाबाहेर खेळण्यासाठी जात आहेत. आपण अशी कथा 'झुंड' या चित्रपटांच्या माध्यमातून पाहिली होती. परंतु तंतोतंत अशी घटना घडत असल्यानं या विषयाची शहरभर चर्चा आहे.
कोण आहेत संदेश बोर्डे : संदेश बोर्डे हे दहावीत शिकत असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्याच दोन वर्षाच्या कालावधीत महाविद्यालयाच्या प्रथम वर्षात ते शिकत असताना त्यांच्या आईचंही निधन झालं. त्यामुळं संदेश बोर्डे पूर्ण पोरके झाले होते. मात्र, ते खचले नाहीत. त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. ते आज एका आयटी कंपनीमध्ये चांगल्या पदावर काम करत आहेत. त्यांची आई पिंपरी चिंचवड शहरातील वाकड येथील काळाखडक झोपडपट्टीतील लहान मुलांचा सांभाळ करत होती. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांच्या वाढत्या व्यसनाला, गुन्हेगारीला आळा बसवण्याचं काम त्यांच्या हातून होत असे. या मुलांना एकत्र करुन त्यांच्यावर योग्य संस्कार देण्याचं काम त्या करत असत. आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, तिनं दिलेली शिकवण जोपासत बोर्डे हे काळाखडक झोपडपट्टीतील मुलांचा सांभाळ करु लागले. मात्र, या मुलांमध्ये सातत्यानं किरकोळ कारणावरुन वाद होत असत. त्यातून टोळ्या करुन गुन्हेगारी कृत्य करत. त्यामुळं या मुलांना फिरायला घेऊन जाणं, कबूतर पाळण्याचा छंद लावणं असा प्रयत्न केला. मात्र, त्यासाठी मोठा खर्च व्हायचा. त्यामुळं या मुलांना क्रीडा प्रकारांकडे वळवण्याचा प्रयत्न बोर्डे यांनी केला.
क्रीडा प्रशिक्षक म्हणून घेतली जबाबदारी : पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली विधिसंघर्षित मुलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले होते. त्यात या मुलांना क्रीडा प्रशिक्षण देण्याची जबाबदारी बोर्डे यांनी घेतली आणि त्यातूनच या प्रवासाला खरी सुरुवात झाली. बोर्डे यांना 'जुवेनाइल जस्टिस बोर्डा'कडून येरवडा निरीक्षण गृहातदेखील क्रीडा प्रशिक्षक म्हणून कार्यभार देण्यात आला. कारागृहात ते नियमित जाऊन विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण केली. ते सामाजिक कार्य व शिक्षण, नोकरी या संदर्भात व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम करत आहेत. गुन्हेगारी क्षेत्रातील मुलं हे चांगले नागरिक बनत आहेत, असं बोर्डे यांनी सांगितलं. तर भविष्यात हीच मुलं क्रीडा शिक्षक व क्रीडा प्रशिक्षक म्हणून तयार होऊन उत्तम खेळाडू तयार करतील, अशी आशा त्यांना आहे.
परिवर्तनाचा संदेश देण्याचं काम : गुन्हेगारी क्षेत्रामुळं दिशा भरकटलेले अन् विधीसंघर्षित मुलांकडे पाहून नाक मुरडणाऱ्याची संख्या खूप आहे. पण त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी संदेश बोर्डे मनापासून धडपडत आहेत. त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे अभिनव प्रयोग राबविण्यास सुरवात केली आणि उपेक्षित मुलांना नव्यानं ओळख मिळू लागली. ते गेल्या पंधरा वर्षापासून खेळाच्या माध्यमातून पुनर्वसनासह सामाजिक परिवर्तनाचा संदेश देण्याचं काम अविरतपणे करत आहेत. शहरातील विविध भागातील गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळं अनेक लहान मुलं वाममार्गाला लागत आहेत. अशा ठिकाणी प्रतिबंध म्हणून संदेश बोर्डे योग्यवेळी त्यांना त्यांच्या 'स्किल' नुसार आवडत्या खेळामध्ये रुची निर्माण करण्याचे काम ते करत आहेत. त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न संदेश बोर्डे यांच्या माध्यमातून होत आहे.
दोन मुलांची भारतीय संघात निवड : येत्या 21 ते 28 तारखेच्या दक्षिण कोरियात होणाऱ्या होमलेस फुटबॉल विश्वकप स्पर्धेमध्ये संदेश बोर्डे यांच्या प्रशिक्षणातून दोन मुलं भारताकडून खेळण्यासाठी निवडली आहेत. त्यात एक मुलगी मोनिका चौहान आणि एक मुलगा एडवीन फलेरो यांचा समावेश आहे. एडवीन फलेरो हा पुण्यातील घोरपडी येथील झोपडपट्टीमध्ये राहणारा असून, तो शाळाबाह्य होता. परंतु, खेळाची आवड असल्यानं त्याचा संपूर्ण खेळ पाहता त्याच्याकडून कसून सराव करुन त्याची निवड ही इतर विधीसंघर्षित मुलांना प्रेरणादायी ठरणार आहे. तर मुलगी हरियाणा राज्यातील असून तिथल्या रुढी परंपरा या मुलींसाठी काही बंधनात असल्यानं तिच्या खेळाचं नुकसान होत होतं. त्यामुळे तिनं पिंपरी चिंचवड इथं येताच संदेश बोर्डे त्यांच्याशी संपर्क केला. तिचीही निवड दक्षिण कोरियामध्ये स्पर्धेसाठी होताना संपूर्ण शहर आनंद व्यक्त करत आहे.
सर्वत्र होतंय कौतुक : आज शहरातील रेकॉर्डवरील आरोपी आणि गुन्हेगारीकडे झुकलेल्या अल्पवयीन मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 'झुंड' या चित्रपटातील कथानकासारखाच प्रकार वास्तवात उतरला असून, निरीक्षण गृह व विशेष गृहात कैदी म्हणून असलेल्यांना जामीनावर सोडवून या इंजिनिअरनं राष्ट्रीय पातळीवर फुटबॉल मॅच खेळवल्या आहेत. प्रशिक्षक संदेश बोर्डे दर शनिवार आणि रविवारी निरीक्षणगृहात जाऊन निवड झालेल्या विधी संधर्षित मुलांना आजही प्रशिक्षण देत आहेत. यामुळं आता राज्यासह देशपातळीवर उत्तम खेळाडू तयार होऊ लागले आहेत. विशेष म्हणजे दररोज या मुलांचा खेळाचा सराव थांबू नये यासाठी पदरमोड करुन बोर्डे यांनी एक स्वतंत्र प्रशिक्षकच नेमला आहे. त्यांच्या या निस्वार्थी कार्याची दखल प्रामुख्यानं पिंपरी चिंचवड शहर पोलीस, शिक्षण मंडळ, घेत असून सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
हेही वाचा :