यवतमाळ Girls Drowned In River : यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकीपासून जवळच असलेल्या सावळेश्वर येथील पैनगंगा नदीवर (Painganga River) दोन मुली कपडे धुण्यासाठी गेलेल्या असताना अचानक तोल जाऊन त्या पाण्यात बुडाल्या. तर त्यांना वाचवण्यासाठी जवळच असलेल्या दोन मुलांनी पाण्यात उडी घेतली. पण या मुलींचा आणि वाचवणाऱ्या एका मुलाचा अशा तिघांचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. कावेरी गौतम मुनेश्वर (१५), अवंतिका राहुल पाटील (१४), चेतन देवानंद काळबांडे (१६), रा.सावळेश्वर, ता.उमरखेड, अशी मृतांची नावं आहेत. यामुळं सावळेश्वर गावावर शोककळा पसरली आहे.
तिघांचाही बुडून मृत्यू : सावळेश्वर येथे मामाच्या घरी आलेली कावेरी आणि तिची मैत्रीण अवंतिका या दोघी गावाजवळून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुणे आटोपल्यानंतर या दोघीही अंघोळीसाठी पाण्यात उतरल्या. पाण्याचा अंदाज न आल्यानं या दोघी खोल पाण्यात बुडू लागल्या. त्यांनी मदतीसाठी आवाज दिली. त्यांची आरडाओरडा ऐकू आल्यानं याच ठिकाणी असलेले चेतन देवानंद काळबांडे आणि शुभम सिद्धार्थ काळबांडे हे दोघे मदतीसाठी धावले. या दोघांनीही नदीपात्रात उडी घेतली. घाबरलेल्या कावेरी आणि अवंतिकाने वाचवण्यासाठी आलेल्या चेतनला घट्ट पकडून ठेवलं. त्यामुळं या तिघांचाही बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी नदीपात्राकडं धाव घेतली. शुभमला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आलं.
काही दिवसापूर्वी वडिलांचा मृत्यू : चौघांनाही नदीतून बाहेर काढून ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आलं. डॉक्टरांनी कावेरी, अवंतिका आणि चेतन यांना मृत घोषित केलं. शुभम याच्यावर प्रथमोपचार करून उपचारासाठी यवतमाळ येथे हलवलं आहे. तर चेतन देवानंद काळबांडे यांच्या वडिलांचासुद्धा काही दिवसापूर्वी साप चावल्यानं मृत्यू झाला होता. तेव्हापासून चेतनची आई कविता ही चेतनसोबत राहात होती. आज चेतनच्या अशा अचानक मृत्यूनं कविताबाई या एकाकी पडल्या असून शासनानं त्यांना योग्य ती मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा -