कोल्हापूर Kolhapur News : कोल्हापुरातून एक दुर्दैवी घटना समोर आलीय. जिल्ह्यातील काळम्मावाडी धरणाच्याजवळ असलेल्या दूधगंगा नदीत (Dudhganga River) दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. कुटुंबासोबत वर्षा पर्यटनाला आलेल्या दोघांवर काळानं घाला घातल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पाय घसरून पडले नदीत : बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथे 13 जण वर्षा पर्यटनासाठी राधानगरी येथे आले होते. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पर्यटक काळम्मावाडी धरण परिसरातील दूधगंगा नदी येथे फिरत असताना, अचानक गणेश कदम आणि प्रतीक पाटील यांचा पाय घसरला आणि बाजूला असलेल्या नदीत दोघेही पडले. यावेळी सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नदीला तीव्र प्रवाह असल्यानं दोघेही प्रवाहात वाहून गेले.
दोन्ही मुलांचे शोध कार्य सुरू : यापैकी प्रतीक पाटील हा वाहनचालक होता. अचानक घडलेल्या या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान या घटनेची माहिती समजताच राधानगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केलंय. तसंच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची एक तुकडी देखील घटनास्थळी रवाना झाली आहे. प्रशासनाच्या वतीनं दोन्ही मुलांचं शोध कार्य सुरू करण्यात आलंय. गेल्या महिन्यात देखील याच ठिकाणी एका व्यक्तीचा अशाच पद्धतीनं बुडून मृत्यू झाला होता. यामुळं पर्यटकांनी वर्षा पर्यटनाला जाताना काळजी घ्यावी असं आवाहन, प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय.
पोलीस आणि बचावपथक घटनास्थळी दाखल : घटनेची माहिती मिळतात राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी तत्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापननं बचाव पथकाला याबाबतची माहिती दिली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे चव्हाण आणि जवान हे घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहांचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
हेही वाचा -