ठाणे Mephedrone MD drug seized in Thane : कल्याण गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून किराणा दुकानातून कोट्यवधी रुपयांचं ड्रग विकणाऱ्या दोघांना अटक केली आहे. खळबळजनक बाब म्हणजे पोलीस पथकानं त्याच्या दुकानाची झडती घेतली असता, दुकानात साडेचार कोटी रुपयांचा मेफेड्रोन (एमडी) पावडरचा साठा सापडल्यानं खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उल्हासनगर शहरातील हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ड्रग्स डीलरला ठोकल्या बेड्या : या प्रकरणातील मुख्य ड्रग्ज विक्रेत्या माफियाला आज 4 मे रोजी पोलीस पथकानं अटक केली आहे. शैलेंद्र राकेश अहिरवार (वय 30, रा. ढोकळी, कोलशेत रोड, ठाणे) असं अटक केलेल्या मुख्य अमली पदार्थ विक्रेत्याचं नाव आहे. तसंच राजेशकुमार प्रेमचंद तिवारी (वय, 41, रा. वृद्धवन कॉलनी, काटई- बदलापूर पाइपलाइन रोड, नेवाळी) असं अटक केलेल्या ड्रग्ज विक्रेत्याचं नाव आहे.
किराणा दुकाणावर छापा : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला अमली पदार्थ विक्रेता राजेशकुमार तिवारीचं किराणा दुकान आहे. या दुकानातून अमली पदार्थ विक्रेते राजेश कुमार मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या पथकानं नेवली येथील वृद्धवन कॉलनीतील तिवारी यांच्या किराणा दुकानावर 3 मे रोजी दुपारच्या सुमारास छापा टाकला.
4 कोटी 50 लाखांचा साठा जप्त : सापळ्यादरम्यान, पोलीस पथकानं तिवारीला ताब्यात घेतलंय. तसंच त्याच्या किराणा दुकानाची झडती घेतली असता तिथं मेफेड्रोन (MD) पावडरचा साठा सापडलाय. याशिवाय अमली पदार्थांच्या साठ्यासह तीन महागडे मोबाईल, 14 हजारांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या साठ्याची किंमत 4 कोटी 50 लाख 70 हजार रुपये आहे. या प्रकरणी कल्याण गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार गोरक्ष मारुती शेकडे (वय 37) यांच्या फिर्यादीच्या आधारे आरोपींवर हिललाइन पोलीस ठाण्यात कलम 8 (सी), 21 (सी) 29 अन्वये अटक करण्यात आली आहे.
आरोपींना न्यायालयात हजर केलं जाणार : या संदर्भात कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांनी सांगितलं, 'अटक आरोपी तिवारी हा किराणा दुकानातून अंमली पदार्थ विकत होता. हा अमली पदार्थाचा साठा दुसरा अटक आरोपी शैलेंद्र अहिरवार पुरवत होता. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना उद्या (5 मे) रोजी न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या गोरखधंद्यात आणखी किती आरोपींचा सहभाग आहे. तसंच हा ड्रग साठा कुठून आणला? याचाही तपास पोलीस पथक करणार' असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हे वाचलंत का :
- Nashik MD Drug Case : नाशिक एमडी ड्रग प्रकरणावरुन राजकारण; कनेक्शन थेट अंडरवर्ल्डशी?
- Nana Patole : नाशिक ड्रग्ज प्रकरणात काही आमदारांचा देखील सहभाग; पुरावे अधिवेशनात सादर करणार- नाना पटोले
- Drug Trafficking : अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 75 परदेशी नागरिकांच्या मुसक्या आवळल्या, साडेचार कोटींचे ड्रग जप्त