मुंबई/ छत्रपती संभाजीनगर/ नागपूर Tribute to Ramoji Rao : भारतीय प्रसार माध्यमांत स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे इनाडू आणि ईटीवी वृत्त समूहाचे संस्थापक दिवंगत रामोजी राव यांना आज मुंबई, छत्रपती संभाजीनगर नागपूरसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आदरांजली वाहण्यात आली. मुंबईतील बीकेसी येथील कार्यालयात रामोजी समुहाच्या विविध कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी आदरांजली वाहिली.
ठिकठिकाणी अर्पण केली श्रद्धांजली : भारतीय फिल्म जगतात रामोजी फिल्म सिटी नावाचं एक आश्चर्य उभारुन ईटीव्ही आणि इनाडू सारख्या वृत्त समूहाच्या माध्यमातून प्रसार माध्यम क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या दिवंगत रामोजी राव यांना आज देशभरात विविध ठिकाणी आदरांजली वाहण्यात आली. महाराष्ट्रात मुंबईत बीकेसी येथील इनाडूच्या कार्यालयात तसंच छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील कार्यालयातही दिवंगत रामोजीराव यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी ईटीव्ही भारतचे तसंच इनाडू वृत्तसमूह, टेलिव्हिजन आणि अन्य संलग्न कंपन्यातील कर्मचाऱ्यांनी मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील कार्यालयात रामोजी राव यांना आदरांजली वाहिली. यावेळी रामोजीराव यांच्या जीवनावर आधारित लघुपटाचं प्रदर्शन करण्यात आलं. तसंच त्यांना पुष्पहार आणि फुलं अर्पण करून, त्यांच्या आठवणींना उजाळा देत कर्मचाऱ्यांनी आदरांजली वाहिली. रामोजी राव यांची कामातील निष्ठा, दूरदृष्टी आणि शिस्तप्रियता तसंच सत्य आणि प्रामाणिकता यांची असलेली सचोटी याविषयी उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
संभाजीनगरातही श्रद्धांजली अर्पण : रामोजी ग्रुपचे सर्वेसर्वा रामोजी राव यांच्या निधनानंतर छत्रपती संभाजीनगर आणि परिसरातील प्रतिनिधींनीही श्रद्धांजली वाहिली. शहरातील सिडको येथील कार्यालयात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, शिर्डी, अहमदनगर जिल्ह्यातील प्रतिनिधींनी एकत्र येत रामोजी राव यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी दिलेला संदेश संभाजीनगर प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी सर्व प्रतिनिधींना वाचून दाखवला. त्यानंतर दोन मिनिटांचं मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर एकत्रित स्मृतीभोजन करुन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. नागपुरात जगप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांनी रामोजी राव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी स्वतः शिरा तयार केला. या शिऱ्याचा प्रसाद सर्वांना देण्यात आला.
हेही वाचा :