मुंबई Toyota Kirloskar Investment : गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात 12 हजार सूक्ष्म तसंच लघु उद्योग बंद पडल्याची माहिती संसदेत देण्यात आलीय. त्यावरून राज्यात महाविकास आघाडी तसंच महायुतीमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. महायुतीच्या काळात राज्याची पिछेहाट होत असून उद्योगाच्या बाबतीत राज्य मागं पडतय. राज्यातील अनेक उद्योग गुजरातकडं वळवले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सरकारवर सातत्यानं केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांची वेळ साधत राज्य सरकारनं प्रतिमा स्वच्छ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
मराठवाड्यात 20 हजार कोटींची गुंतवणूक : राज्यात गेल्या चार वर्षात 12 हजार लघुउद्योग बंद झाल्याची माहिती सूक्ष्म तसंच लघुउद्योग मंत्रालयानं संसदेत दिली होती. त्यानंतर राज्य सरकारनं प्रतिमा सुधारण्यासाठी रंग सफेदी करण्याची सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर जपानच्या टोयोटा कंपनीनं मराठवाड्यात 20 हजार कोटींची गुंतवणूक करण्याच्या सामंजस्य करारावर सह्या केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे जपानच्या टोयोटा तसंच किर्लोस्कर कंपनीच्या माध्यमातून मोटार वाहन निर्मिती उद्योगात गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी आज राज्य सरकारनं सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलीय.
काय आहे प्रकल्प : या प्रकल्पाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरमध्ये इलेक्ट्रिक तसंच हायब्रीड चार चाकी गाड्यांचं उत्पादन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून या माध्यमातून सुमारे आठ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. तसंच विविध अप्रत्यक्ष रोजगार देखील उपलब्ध होणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या प्रकल्पात प्रत्येक वर्षी सुमारे चार लाख गाड्यांची निर्मिती होणं अपेक्षित असल्याचं यावेळी सांगण्यात आलय. या सामंजस्य करारासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्यासह किर्लोस्कर मोटर्सच्या उपाध्यक्षा मानसी टाटा, टोयोटा किर्लोस्करचे व्यवस्थापकीय संचालक मसाकाझु योशीमुरा उपस्थित होते.
मराठवाड्याच्या विकासाला चालना : या संदर्भात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठवाड्याच्या विकासासाठी ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. मराठवाड्यात 20 हजार कोटींची गुंतवणूक आल्यानं मराठवाड्यातील तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मराठवाड्याच्या विकासाला यामुळं निश्चित चालना मिळणार आहे. त्यामुळं मी मराठवाड्याचा जनतेचं अभिनंदन करतो, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
'हे' वाचलंत का :
- "ही सगळी हारुन अल-रशीदची पोरं...", वेषांतरावरून संजय राऊतांचा सणसणीत टोला - sanjay raut criticise on ajit pawar
- "मुख्यमंत्री शिंदे मौलवीच्या वेशात दिल्लीला जाऊन...", वेषांतराच्या मुद्द्यावरुन संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut Criticism
- 'राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा - Uddhav Thackeray targeted Fadnavis