ठाणे : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात बुधवारी (20 नोव्हेंबर) मतदान पार पडलं. राज्यात जवळपास 65 टक्के मतदान झालं असून, ठाणे जिल्ह्यात एकूण 56.05 टक्के मतदान झालंय. ठाणे जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात 2019 विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढला. यंदा मतदानाचा वाढलेला टक्का भाजपा महायुतीच्या पथ्यावर पडणार असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषक करत आहेत.
भिवंडीत सर्वाधिक मतदान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील 18 जागांवरील निवडणूक महायुतीसाठी महत्त्वाची आहे. भाजपाची 10 जागांवर मविआतील घटक पक्षांविरुद्ध लढत होत आहे. तर पाच ठिकाणी मनसेही रिंगणात असल्यानं लढती रंगतदार झाल्या आहेत. या 18 विधानसभा मतदारसंघात एकूण 244 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये 17 विद्यमान आमदार तर एका ठिकाणी विद्यमान आमदाराच्या सौभाग्यवती आहेत. 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानात सर्वाधिक 69.01 टक्के मतदान भिवंडी ग्रामीण विधानसभा क्षेत्रात झालंय. तर सर्वात कमी 47.75 टक्के मतदान अंबरनाथ मतदार संघात झालंय. 2019 च्या तुलनेत यंदा सहा टक्के अधिक मतदान झालंय.
दरम्यान, विद्यमान महायुती सरकारनं राबवलेली ' मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' तसंच विविध लोकोपयोगी योजनांमुळं मतदार महायुतीच्या पाठीशी असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळं या निवडणुकीतील मतांचा वाढीव टक्का महायुतीच्या पथ्यावर पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाणे जिल्ह्यातील विधानसभानिहाय टक्केवारी :
- भिवंडी ग्रामीण – 69.01
- शहापूर – 68.32
- भिवंडी पश्चिम – 54.1
- भिवंडी पूर्व – 49.2
- कल्याण पश्चिम – 54.75
- मुरबाड – 64.92
- अंबरनाथ – 47.75
- उल्हासनगर – 54
- कल्याण पूर्व – 58.5
- डोंबिवली – 56.19
- कल्याण ग्रामीण – 57.81
- मिरा भाईंदर – 51.76
- ओवळा माजिवडा – 52.25
- कोपरी पाचपाखाडी – 59.85
- ठाणे – 59.01
- मुंब्रा कळवा – 52.01
- ऐरोली – 51.5
- बेलापूर - 55.24
मत मोजणीसाठी यंत्रणा सज्ज : विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार असल्यानं मतमोजणीसाठी प्रशासनानं निवडणूक निरीक्षक नेमले असून कामाची लगबग सुरू झाली आहे. कोपरी-पाचपाखाडी मतदार संघाची मतमोजणी 'वागळे इस्टेट आयटीआय' येथे होणार आहे. तर ठाणे शहर विधानसभेची मतमोजणी 'न्यू होराइजन स्कूल'मध्ये होणार आहे. तसंच ओवळा-माजिवडाची मतमोजणी 'आनंदनगर होरिझोन स्कूल'मध्ये आणि मुंब्रा-कळवा मतदार संघाची मतमोजणी मुंब्रा येथील 'भारतरत्न अब्दुल कलाम स्टेडिअम' येथे होणार आहे. दरम्यान, ईव्हीएम मशीनची मतं मोजण्यासाठी जिल्ह्यात 286 टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर पोस्टल बॅलेटची मतं 82 टेबलवर आणि सैनिकांची मतं मोजण्यासाठी 21 टेबल आहेत. त्यामुळं मतमोजणी जलद होणार असून एक तासात निकाल लागेल, असा विश्वास निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय.
नोट : ही मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगाने दिलेली आहे. त्यात बदल झाल्यास सुधारित आकडेवारीसाठी निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाइट पाहावी...https://mahasec.maharashtra.gov.in/ किंवा व्होटर टर्नआऊट अॅप पाहा.
हेही वाचा -