ठाणे : राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकानं दुचाकीला कट मारल्याच्या वादातून एका 22 वर्षीय तरुणाला मारहाण केली. या मारहाणीनंतर तरुणानं आत्महत्या केल्याची घटना मुरबाड तालुक्यातील सायले गावात घडली. याप्रकरणी मृताच्या भावानं दिलेल्या तक्रारीवरून एसटी चालकाविरोधात टोकावडे पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. नितीन पांडुरंग सूर्यराव असं चालकाचं नाव आहे. तर प्रविण ठाकरे असं मृत तरुणाचं नाव आहे.
नेमकं काय घडलं? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण हा मुरबाड तालुक्यातील सायले गावात कुटूंबासह राहत होता. तर आरोपी हा राज्य परिवहन महामंडळाच्या मुरबाड आगारमध्ये एसटीवर चालक म्हणून कार्यरत आहे. आरोपी सायले गावात राहतो. 31 ऑक्टोबर रोजी मुरबाड आगाराची बस ही रात्री किसळ गावात आली होती. तिथून सायले गाव जवळच असल्यानं नितीन बस घेऊन आपल्या गावी मुक्कामाला गेला. बस उभी केल्यानंतर नितीन मोटारसायकल घेऊन घराबाहेर पडला. तिथून उमरोलीकडं जात असताना सायले गावाच्या हद्दीतील रोडवर आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत असलेल्या प्रविणशी नितीनचा वाद झाला. त्यामध्ये नितीननं प्रविणला बेदम मारहाण केली. नाहक मारहाणीमुळं प्रविणला मनस्ताप सहन झाला नाही. त्यानं पहाटेच्या सुमारास आत्महत्या केली.
गुन्हा दाखल : घटनेची माहिती मिळताच टोकावडे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. तसंच पंचनामा करत त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्यानंतर 1 नोव्हेंबर रोजी मृतकचा भाऊ सुधीर ठाकरे याच्या तक्रारीवरुन भारतीय न्याय संहिता कलम 108, 115, 352, 351 (1), 351 (2) सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर एसटी चालकाला अटक करण्यात आली. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर चकोर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, "2 नोव्हेंबर रोजी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयानं त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे."
वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी : या घटनेप्रकरणी माध्यमांशी संवाद साधत असताना आदिवासी संघटनेचे नेते दिनेश जाधव यांनी सांगितलं की, "एसटी चालक नितीन सुर्यराव याला अटक करण्यात आली आहे. मात्र, त्याच्यासोबत असलेल्या बस वाहकाला देखील सहआरोपी करण्यात यावं." महामंडळाची ही बस चालक कोणाच्या आदेशानं घरी नेत होता. याची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणीही दिनेश जाधव यांनी केली आहे.
आत्महत्या हा उपाय नाही- जर तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील अथवा एखाद्या मित्राबद्दल काळजी वाटत असेल किंवा तुम्हाला भावनिक आधाराची गरज असेल, तर कोणीतरी नेहमी ऐकण्यासाठी उपलब्ध असते. तुम्ही स्नेहा फाउंडेशन - 04424640050 (24x7 उपलब्ध) किंवा iCall, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेची हेल्पलाइन - 9152987821 वर कॉल करा. ही हेल्पलाईन सोमवार ते शनिवार सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत उपलब्ध आहे.
हेही वाचा -