ठाणे : खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पैसे उकळल्या प्रकरणी माजी पोलीस महासंचालक संजय पांडे आणि त्यांच्या सहा सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी बुधवारी माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांची तब्बल साडेतीन तास चौकशी करण्यात आली. संजय पांडे यांच्याविरोधात ऑगस्ट 2024 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार व्यापारी संजय मिश्रीमल पुनामिया यांच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी केली चौकशी : ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह माजी सहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील, पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, वकील शेखर जगताप तसेच श्यामसुंदर अग्रवाल, शुभम अग्रवाल, शरद अग्रवाल यांचा समावेश होता. सदर प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेच्या कार्यालयात दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास संजय पांडे हे उपस्थित झाले. गुन्हे शाखा वागळे इस्टेट येथील कार्यालयात पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी स्वतः अडीच तास त्यांची चौकशी केली. चौकशी बाबत गुप्तता बाळगण्यात आली. तर 3-45 वाजता माजी पोलीस महासंचालक संजय पांडे हे गुन्हे शाखेच्या कार्यालयात जबाब नोंदवून निघून गेले.
युएलसी प्रकरण रिओपन करून सहा खोटे गुन्हे दाखल केले - तक्रारदार : माजी पोलीस महासंचालक संजय पांडे हे ठाणे गुन्हे शाखा युनिट-5 च्या वागळे येथील कार्यालयात हजार झाले. त्याचवेळी तक्रारदार संजय पुनामिया हे ही उपस्थित होते. त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, "संजय पांडे यांनी बेकायदेशीरपणे युएलसी प्रकरणाची पुन्हा चौकशी करून आमच्यावर तब्बल सहा खोटे गुन्हे दाखल केले. यामागे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग याना अडकवण्याचं टार्गेट पांडेचं होते," अशी माहिती संजय पुनामिया यांनी दिली. यासाठी संजय पांडे यांनी नियमबाह्य आणि कायद्याच्या बाहेर जाऊन हा प्रकार केल्याचा आरोप त्यांनी केला. त्याबाबत तक्रारदारानं ईमेलवर केलेल्या तक्रारीत मे 2021 ते 30 जून 2024 या कालावधीत यातील कथीत आरोपींकडून त्रास सहन केल्याचा दावा त्यांनी केला.
माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंवर का दाखल झाला गुन्हा : तत्कालीन पोलीस महासंचालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठाणे नगर पोलिसांमध्ये 2016 मध्ये दाखल झालेल्या एका युएलसी गुन्ह्याचा बेकायदेशीर तपास केला. तक्रारदार आणि इतर व्यावसायिकांना खोट्या केसेसच्या धमक्या दिल्या, पैसे उकळले आणि विशेष सरकारी वकील म्हणून खोटे दस्तऐवज तयार करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असा तक्रारदारांचा आरोप आहे. सन 2016 च्या गुन्ह्यात तक्रारदार यांच्यावर लावलेल्या गुन्ह्यात 166 (अ) आणि 170 (शासकीय कर्मचाऱ्यांची गैरवर्तणूक आणि खोटे रूप धारण), 120 बी (फौजदारी कट), 193 (खोट्या पुराव्यांची निर्मिती), 195, 199, 203, 205, आणि 209 (खोटे विधान आणि न्यायालयाच्या कार्यात अडथळा), 352 आणि 355 (हल्ला), 384 आणि 389 (जबरदस्ती), 465, 466, आणि 471 (खोट्या दस्तऐवजांची निर्मिती आणि वापर) आदी कलमांचा समावेश होता. बेकायदेशीर तपास केल्या प्रकरणी अखेर संजय पुनमिया यांनी संजय पांडे यांच्यासह 7 जणांवर ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याच प्रकरणात संजय पांडे हे ठाण्यात गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट येथील कार्यालयात हजर झाले.
हेही वाचा :