ठाणे Badlapur Minor Girl Sexual Assault : बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील एक चिमुकली तीन वर्षे आठ महिन्यांची आहे. तर दुसरी चिमुकली ही सहा वर्षांची आहे. हा धक्कादायक प्रकार उजेडात येताच जमाव मोठ्या प्रमाणात संतप्त झाला. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. असं असताना आरोपीला 17 ऑगस्ट रोजी अटक करुन त्याला न्यायालयात हजर केलं असता, त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र आज कोठडी संपल्यानं पुन्हा त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात आरोपी अक्षय शिदेंला हजर केलं असता 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कल्याण न्यायालयातील न्यायाधीश वी ए पत्रावळे यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली. यावेळी विशेष सरकारी वकील अश्विनी भामरे पाटील यांनी युक्तीवाद केला.
आजही इंटरनेट सेवा बंद : दोन चिमुकल्या विद्यार्थिंनीवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर हजारो नागरिक मंगळवारी रस्त्यावर उतरले. सकाळपासून नागरिकांनी शाळेबाहेर आंदोलन सुरू असतानाच शेकडो नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात रेल्वेची वाहतूकही रोखून धरली. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सेवा ठप्प झाली. संपूर्ण बदलापुरात संतापाचं वातावरण आहे. आजही इंटरनेट सेवा बंद असून जमावबंदी शहरात लागू केली आहे. तर काही भागात वीज पुरवठा खंडित करण्यात आला.
कल्याण जिल्हा न्यायालयात केलं हजर : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला कल्याण जिल्हा न्यायालयात हजर करण्यापूर्वी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आरोपीला फाशी द्या अशी मागणी बदलापूरकरांकडून केली जात होती. बदलापुरातील पालक आणि नागरिकांचा रोष पाहता आरोपीवर हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे कायदा सुव्यवस्था पाहता पोलिसांनी स्टेशन परिसरासह कल्याण न्यायालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
हेही वाचा :
- बदलापूर शहर आजही बंद; पोलिसांनी 38 आरोपींना केलं अटक: तगडा बंदोबस्त तैनात, सुषमा अंधारे देणार भेट - Badlapur Protest
- बदलापूर पाठोपाठ मुंबईत आठ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार - Molestation
- बदलापूर अत्याचार प्रकरण : कल्याणहून बदलापूरच्या दिशेनं लोकल सेवा सुरू, आज तगडा पोलीस बंदोबस्त तैनात - Badlapur Protest