मुंबई Ravindra Waikar Joins Shiv Sena : लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. या अगोदरच मोठ्या प्रमाणात आमदार आणि खासदार ठाकरेंची साथ सोडून गेलेले असताना, पुन्हा एका शिलेदारानं ठाकरेंची साथ सोडली आहे. दरम्यान, आमदार वायकर यांच्यामागं गेल्या अनेक दिवसांपासून ईडी चौकशीचा ससेमिरा सुरू आहे.
'या' प्रकरणात आहे ईडी चौकशी सुरू : मुंबई महापालिकेच्या मैदानासाठीच्या आठ हजार चौरस मीटरच्या राखीव भूखंडावर पंचतारांकित हॉटेल उभारणी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी आमदार रवींद्र वायकर यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीच्या निशाण्यावर असले तरीही उद्धव ठाकरे यांना साथ त्यांनी दिली होती. मात्र, वायकर यांच्या पक्ष बदलाच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून सुरूवात झाली होती. अखेर वायकर यांनी शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय.
काय म्हणाले वायकर? : "मी गेली 50 वर्ष बाळासाहेबांच्या शिवसेनेत काम करतोय. मी आता हा जो प्रवेश करतोय, त्याचं कारण वेगळं आहे. आरेमधील रस्त्यासाठी लोक रडत आहेत. अशा अवस्थेत मी लोकांसमोर कसं जाऊ," असं म्हणत "सत्तेशिवाय प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळं माझे हे प्रश्न मार्गी लागावेत या अपेक्षेनं मी हा प्रवेश केलाय," अशी पहिली प्रतिक्रिया प्रवेशानंतर रवींद्र वायकर यांनी दिलीय. दरम्यान, "वायकर यांचं स्वागत करतो असं म्हणत आम्ही 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करणारे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. त्यामुळं आम्ही फक्त विकासाच्या मार्गानं चालतो आणि चालत राहू," अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वायकर यांचं स्वागत केलं.
उद्धव ठाकरेंवर निशाणा : "वायकर आणि माझे अनेक वर्षापासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यांना कामाचा, प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. नगरसेवक. स्थायी समिती अध्यक्ष आणि आमदार असा त्यांचा प्रवास आहे. रवींद्र वायकर यांनी अगदी योग्य निर्णय घेतलाय. आम्ही उठाव केल्यानंतर रवींद्र वायकर आणि माझ्यात संभ्रम निर्माण करणारा तिसराच माणूस होता. आता तो तिसरा माणूस कोण ते तुम्ही ओळखा," अशी अप्रत्यक्ष टीका उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदे यांनी केती. "वायकर यांनी आता माझ्याकडे काही मतदारसंघातील कामं दिली आहेत. ती कामं मी मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही. कारण मी दिलेला शब्द पूर्ण करतो," असं मुख्यमंत्री म्हणाले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे? : "इकडचा खडा तिकडं गेल्यानं शिवसेनेला काहीही फरक पडत नाही. शिवसेनेची ताकद कमी होत नाही. भाजपामध्ये कोणी नेता उरला नाही म्हणून ते अन्य पक्षातील नेते घेतायेत. जय श्रीराम ऐवजी आता 'जय आयाराम' अशी भाजपानं घोषणा द्यावी," असा टोला उद्धव ठाकरे यांनी वायकर यांच्या प्रवेशानंतर भाजपाला लगावलाय.
काय म्हणाले होते राऊत? : रवींद्र वायकर यांच्यावर दबाव असल्याचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दावा केला होता. '"शिवसेनेतील आमचे सहकारी नेते आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून ईडी वगैरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव आहे. येत्या काही दिवसांत शिवसेना सोडा. पक्षांतर करा. नाहीतर तुरुंगात जा, असं त्यांना धमकावलं जात आहे. हा दहशतवाद आहे. असं राजकारण याआधी कधीच झालं नव्हतं," असं मत एक्स (ट्विटर)वर राऊत यांनी व्यक्त केलं होतं.
गैरव्यवहार नसल्याचा दावा : पंचतारांकित हॉटेल उभारणी प्रकरणात रवींद्र वायकर यांना अटकेची भीती होती. "मी कोणताही गैरव्यवहार केला नाहीय. परंतु, तरीही राजकीय आकसापोटी माझ्या मागं चौकशीचं शुक्लकाष्ट लागलं," अशा भावना वायकर यांनी त्यांच्या निकटवर्तीयांकडं बोलून दाखवल्या होत्या. पण लोकसभेआधी हा पक्षप्रवेश होणे सत्ताधाऱ्यांसाठी महत्त्वाचं असल्यानं अखेर वायकरांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसंच, वायकरांना आपल्याला अटक होऊ शकते अशी भीतीही काही दिवसांपासून वाटत होती, अशी चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे.
हेही वाचा :
1 मला अटक होण्याची शक्यता; पण मी लढत राहणार, आमदार रोहित पवारांचा निर्धार
2 लोकसभा निवडणूक 2024 : मुंबईत 'बाप विरुद्ध बेटा' लढत होण्याची शक्यता
3 शिर्डीची जागा भाजपला मिळावी; जी कार्यकर्त्यांची मागणी तीच माझी मागणी - राधाकृष्ण विखे-पाटील