अमरावती Tendupatta collection : देशभरातील घनदाट जंगलांमध्ये एप्रिल मे महिन्यात 'तेंदुपत्ता' (Tendupatta) संकलन केलं जातं. अमरावती जिल्ह्यात पोहरा आणि चिरोडीच्या जंगलामध्ये एकूण 11 गावात 'तेंदुपत्ता' संकलन केलं जात आहे. शेतकऱ्यांना पावसाळ्यापूर्वी शेतीची कामे सुरू होण्याआधी या 'तेंदुपत्ता' संकलनातून हाताशी बऱ्यापैकी पैसा साठवता येतो. बिड्या बनविण्यासाठी लागणारा तेंदूपत्ता संकलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळतो.
वनविभाग काढते निविदा : महाराष्ट्र वन उत्पन्न अधिनियम 1969 च्या कायद्यानुसार जंगलातील तेंदुपत्त्याची पानं शासनानं दिलेल्या नियमाअंतर्गतच तोडावी लागतात. निविदा काढून तेंदूची पाने आणि विल्हेवाट लावण्याच्या निविदा प्रक्रियेअंतर्गत विक्री केली जाते. योग्य किंमतीच्या निविदांना प्राधान्य देऊन मान्यता दिली जाते. परवानाधारक युनिट्सकडून स्वतःच्या किंमतीवर तेंदुची पाने गोळा करणं, त्यावर प्रक्रिया करणं आणि विक्रीसाठी वाहतूक ही सर्व व्यवस्था लावणं हे संबंधित कंत्राटदाराची जबाबदारी असते. अमरावती शहरालगत असणाऱ्या पोहरा आणि चिरुडीच्या जंगलामध्ये वाढवणा येथील श्री संत सेवालाल महाराज 'तेंदुपत्ता संस्था' तेंदूपत्ता संकलन करते. या भागातील कंत्राट मध्यप्रदेशातील खंडवा तालुक्यात येणाऱ्या गुंजा बाजार येथील सपू मलानी या कंत्राटदाराने घेतलं आहे. पोहरा-चिरोडीच्या जंगलामध्ये एकूण 11 मुंशी हे 11 फड सांभाळतात.
पोहरा जंगलात अकरा गावांमध्ये तेंदूपत्ता संकलन : पोहरा आणि चिरोडी हे जंगल वडाळी वनपरिक्षेत्र तसंच चांदुर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत येतात. चिरोडी, पोहरा, वीरगव्हाण, वाढोणा, माळेगाव, शिंदोळा भानखेडा, भानखेडा अशा एकूण 11 गावांमध्ये तेंदुपत्ता संकलन केलं जातं. ह्या 11 गावांमध्ये तेंदुपत्ता संकलनाच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी फड मुंशी नेमण्यात आले आहेत. मजुरांना योग्य मजुरी देणं तसंच शासनाकडून या कामासाठी मजुरांना बोनस मिळणं यासाठी फड मुंशी म्हणून आम्ही लक्ष देतो. तेंदुपत्ता संकलनामुळं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या हाती योग्य पैसा येतो. हा पैसा पावसाळ्यात शेतीसाठी त्यांना कामाला येतो अशी माहिती, चिरोडी येथील फड मुंशी चरण चौधरी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
दिवसाकाठी मिळतात सातशे रुपये : पोहरा आणि चिरोडीच्या जंगलात तेंदुपत्ताची झाडे आहेत. या झाडाची पानं तोडण्यासाठी महिला, युवक आणि पुरुष सकाळी सहा वाजताच जंगलात पोहोचतात. सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत पानं तोडून आणल्यावर अनेक महिला या दुपारी देखील जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी जातात. 100 पानांचा एक पुडा आणला तर त्यासाठी 385 रुपये रोजगार पडतो. अनेक जण 200 च्या वर पानं तोडून आणतात, त्यामुळं त्यांना 700 रुपये रोजगार मिळतो.
अकराही गावांमध्ये लागलेत फड : पोहरा चिरोडीच्या जंगलामध्ये तेंदुपत्ता संकलित करून आणल्यावर तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या अकराही गावांमध्ये तेंदूदुपत्ताचे फड लागले आहेत. फड मुंशी स्वतःच्या शेतामध्ये मजुरांनी तोडून आणलेली तेंदूची पानं उन्हात सुकायला टाकतात. महिनाभरापूर्वी आणलेली हिरवी पानं उन्हात सुकून लाल झालेली दिसतात तर नवीन आलेल्या पानांचा रंग हिरवा तर काही दिवसांपूर्वी आलेली पान ही काहीशी लालसर दिसतात. अकराही गावांमध्ये लागलेल्या फडांवरील पानांच्या या रंगामुळं तेंदुपत्त्याचा फड हा दुरून अगदी नजरेत भरतात.
मेळघाटात 1 कोटी 52 लाख रुपयांची उलाढाल : तेंदुपत्ता संकलन आणि व्यापाराच्या माध्यमातून मेळघाटातील एकूण 52 गावं मिळून एक कोटी 52 लाख रुपयांची वार्षिक उलाढाल होत असल्याची माहिती, ग्रुप ऑफ ग्रामसभेचे सीईओ रामलाल काळे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. 2013 मध्ये मेळघाटातील आदिवासींना वन हक्क कायद्याअंतर्गत तेंदू पत्ता संकलनाचा अधिकार मिळाल्यावर हे काम एकट्यानं नव्हे तर कम्युनिटीनं करणं शक्य असल्याचं लक्षात आलं. यामुळं तेंदुपत्ता संकलनात आघाडीवर असणारी मेळघाटातील एकूण 52 गावं एकत्रित आलीत. तेंदुपत्ता संकलनासाठी ग्रुप ऑफ ग्रामसभा स्थापन करण्यात आली. ग्रुप ऑफ ग्रामसभेच्या माध्यमातून तेंदुपत्ता संकलन करणाऱ्या व्यक्तींना योग्य मोबदला देणं, वर्षाकाठी बोनस देणं अशा सर्व प्रक्रिया केल्या जात असल्याची माहिती, रामलाल काळे यांनी दिली.
मेळघाटात यावर्षी गोदामची गरज : यावर्षी मोठ्या प्रमाणात तेंदुपत्ता संकलन झालं असून तेंदुपत्ता वाहतुकीमध्ये यावर्षी पहिल्यांदाच वनविभागाच्या काही अधिकाऱ्यांकडून आडकाठी आणली जात आहे. यामुळं मोठ्या प्रमाणात तेंदुपत्ता उघड्यावरच पडून आहे. आता कधीही पाऊस येऊ शकतो. त्यामुळं तेंदुपत्ता खराब होण्याची भीती असल्यामुळं शासनाने हा तेंदुपत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी गोदाम उपलब्ध करून देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही पाठपुरावा करत आहोत असं देखील रामलाल काळे यांनी सांगितलं.
या राज्यांमध्ये आहे मागणी : तेंदुपत्ता हा बिड्या बनविण्यासाठी वापरला जातो. महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्र प्रदेश ,गुजरात ,पश्चिम बंगाल, झारखंड, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये बिड्या बनविणारे अनेक कारखाने असून या ठिकाणी तेंदुपत्त्याला मोठी मागणी आहे. सध्या सर्वत्र तेंदुपत्ता तोडणी मोठ्या प्रमाणात झाली असून पोहरा आणि चिरोडीच्या जंगलातून लवकरच तोडण्यात आलेला तेंदुपत्ता हा मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यात पाठवला जाणार आहे. अमरावती जिल्ह्यात पोहरा-चिरोदीच्या जांगलासह परतवाडा वन परिक्षेत्र अंतर्गत येणारे जंगल तसेच मेळघाटातील चिखलदरा आणि धरणी तालुक्यातील 52 गावामधून देखील तेंदुपत्ता संकलनाद्वारे ग्रामस्थांना मोठा आर्थिक आधार मिळत आहे.
हेही वाचा -