ठाणे Malshej Ghat Accident : आळेफाट्याच्या दिशेनं कल्याणकडं जाणारा दुधाचा ट्रक आणि माळशेज घाटाकडं जाणारा भाजीपाल्याचा टेम्पो यांच्यात समोरासमोर धडक होऊन तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कल्याण-नगर माहामार्गावरील माळशेज घाट परिसरातील भोरांडे गाव हद्दीतील महामार्गावर घडली. याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. अक्षय शांताराम दिघे (वय 30) आणि त्यांची पत्नी तेजस दिघे (वय 26), तसंच दत्तात्रय वामन (वय 42) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत.
नेमकं काय घडलं? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय आणि तेजस हे जुन्नर गावात राहणारे होते. शुक्रवारी (3 मे) सकाळी दत्तात्रय दुधाचा टँकर घेऊन कल्याणच्या दिशेनं निघाले होते. यावेळी त्यांच्यासह दुधाच्या टँकरमधून मृतक पती पत्नी देखील प्रवास करीत होते. दुपारी माळशेज घाट परिसरातील भोरांडे गाव हद्दीतील महामार्गावर दुधाच्या टँकरची आणि भाजीपाला टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दुधाचा टँकर महामार्गालगतच्या 40 ते 60 फूट खोल नाल्यात कोसळला. तसंच यावेळी टेम्पोचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या दुर्घटनेत दुधाच्या टँकरमधील तिघांचा मृत्यू तर टेम्पोमधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच, माळशेज घाट पोलीस, टोकावडे पोलीस, उपविभागीय अधिकारी जगदीश शिंदे, टोकावडे पोलीस निरीक्षक दिनकर चकोर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना तातडीनं टोकावडे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
टेम्पो चालकावर गुन्हा दाखल : या अपघातासंदर्भात टोकावडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर चकोर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितलं की, "दुधाचा टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या 40 ते 60 फूट खोल नाल्यात पडला, यात अक्षय शांताराम दिघे आणि त्यांची पत्नी तेजस यांचा मृत्यू झाला. मृतक अक्षय हा पोलीस कर्मचाऱ्याचा भाऊ आहे. तसंच या प्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर तिघांचे मृतदेह मुरबाड शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेत. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे,"
हेही वाचा -