अमरावती Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण योजना' राज्यात एक जुलैपासून सुरू झालीय. मुख्यमंत्र्यांच्या या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या वरुड तालुक्याच्या तलाठ्याला निलंबित करण्यात आलय. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या संदर्भात आज माहिती दिली. तुळशीराम कंठाळे असं निलंबित करण्यात आलेल्या लाचखोर तलाठ्याचं नाव आहे.
असे आहे प्रकरण : महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण योजना' एक जुलैपासून सुरू केली. या योजनेसाठी 21 ते 30 वर्षे वयोगटातील महिला पात्र असून याकरता एक जुलैपासून तलाठी कार्यालय तसंच शहरी भागात तहसील कार्यालयात आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अमरावती शहरासह जिल्ह्यात सर्व ठिकाणी या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे. वरुड येथे या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तुळशीराम कंठाळे हा तलाठी चक्क महिलांकडून पैसे वसूल करत असल्याचं समोर आलय. महिलांकडून पैसे उकळतानाचा त्याचा व्हिडिओ आणि फोटो देखील व्हायरल झाल्यानं सर्वत्र खळबळ उडाली.
मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल : मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण' ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांना लाभ मिळावा असा उद्देश असताना महिलांकडूनच या योजनेसाठी लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याच्या प्रतापाची दखल स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. यामुळच त्या तलाठ्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे. त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात असल्याचं जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितलं.
या योजने करता महिलांना मिळणार योग्य सुविधा : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ हा महिलांना मिळावा यासाठी महिलांना योग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सेतू केंद्रांवर झुंबड उडत असल्यामुळं महिलांना त्रास होत आहे. याबाबत योग्य काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा -