ठाणे swine flu patients in Thane : पावसाळा सुरू झाला की साथीचे आजार वाढतात. या वाढलेल्या आजारात स्वाइन फ्लूची भर पडली आहे. जूनपासून ठाणे महापालिकेच्या हद्दीत स्वाइन फ्लूचे 70 रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर ठिकठिकाणी उपचार सुरू आहेत. त्यामुळं कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात स्वाइन फ्लूसाठी आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला असून, या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.
स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्येही वाढ : महापालिका क्षेत्रात डेंग्यू मलेरियाचे रुग्ण वाढत असल्यानं स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. या रुग्णांना हाताळण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळं त्यांच्यासाठी कळवा रुग्णालयात विशेष वॉर्ड करण्यात आला आहे. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, पाणी साचू नये यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन पालिका प्रशासनानं केल्याचं जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांनी सांगितलं.
आकड्यांची लपवा छपावी : ठाण्यात पालिका प्रशासनानं अधिकृतरीत्या पत्रक काढून स्वाईन फ्लूचे 70 रुग्ण असल्याचं सांगितलं. दुसरीकडं जिल्हा प्रशासनानं मात्र, जिल्ह्यात डेंग्यू मलेरियाचे एकूण तीन रुग्ण असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी जिल्ह्यात स्वाईन फ्लू नसल्याची आकडेवारी दिली आहे. त्यामुळं ठाणेकरांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
पावसाळ्याच्या साथीच्या आजारात वाढ : मुंबईसह राज्यभरात स्वाइन फ्लूची साथ पसरली आहे. 15 जूनपर्यंत राज्यात 432 जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याची माहिती देण्यात आली होती. त्यात आता ठाण्यातील 70 रुग्णांची भर पडली आहे. सरकारी वैद्यकीय आकडेवारीनुसार, स्वाइन फ्लूमुळं 15 जूनपर्यंत 15 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, डायरिया या साथीच्या आजारांचा फैलाव होताना दिसतो. मात्र, यंदा अचानक स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यानं प्रशासनाची डोकेदुखीही वाढली आहे. मुंबईसारख्या शहरात रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. गेल्या वर्षीही स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती. गेल्या वर्षी स्वाइन फ्लूमुळं 32 जणांना जीव गमवावा लागला होता.
हे वाचलंत का :
- स्वाईन फ्लूचा दहावा बळी : नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन, अशी घ्या काळजी - swine flu
- नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा कहर; गेल्या 24 तासांत 2 जणांचा मृत्यू, डेंग्यूची रुग्ण संख्या 100 च्या पुढं - Nashik Swine flu News
- स्वाइन फ्लू आणि डेंग्यू रुग्णांची माहिती दडवणाऱ्या 650 रुग्णालयांवर होणार फौजदारी कारवाई - Swine Flu And Dengue Case