पुणे Sugarcane Farming : ऑक्सफर्ड विद्यापिठ, मायक्रोसॉफ्ट व बारामतीतील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थांनी संयुक्तपणे आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा वापर कृषी क्षेत्रात करण्यासाठी गेली 3 वर्ष उत्तम संशोधन करुन कृषी विज्ञान केंद्र, बारामती इथं यशस्वी चाचणी घेतली. यानंतर आता "आर्टिफिशियल इंटेलिजेन्स फॉर अॅग्रीकल्चरल टेक्रॉलॉजी अॅड क्लायमेट चेंज इन शुगरकेन फार्मिंग" हा प्रकल्प राज्यभरातील सुमारे 1000 शेतकऱ्यांच्या शेतात राबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली. पुण्यातील मोदी बाग इथं ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली. हे संशोधन फक्त शेतकऱ्यांपुरतं मर्यादीत न ठेवता संशोधक, शास्त्रज्ञ, विद्यार्थी व उद्योजकांना देखील उपलब्ध करुन देण्याचा तिन्ही संस्थांचा मानस आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ निवडक प्रगतशील शेतकऱ्यांना ऊस शेतीसाठी लागणारं अत्याधुनिक उपकरणं शरद पवार यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले.
कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी शेती : भारतात आता मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती केली जात आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा वापर होताना आपल्या पाहायला मिळत आहे. अशातच आता या तंत्रज्ञानाचा वापर करुन भारतात प्रथमच ऊस शेती होणार आहे. ऊस उत्पादकांसाठी हा प्रकल्प वरदान ठरणार असून कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी ही ऊस शेती भविष्यातं शक्य होईल असा विश्वास संशोधकांना वाटत आहे. सन 2022 मध्ये इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान जॉन्सन बोरीस यांनी भारत आणि इंग्लंड यांच्यात करार करताना सहा ठळक बाबींचा उल्लेख केला होता. यात दुसऱ्या कमांकावर ऑक्सफर्ड विद्यापीठ व अॅग्रीकल्वरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्यातील सामंजस्य करार होता. या कराराअंतर्गत ऑक्सफर्डचे संचालक डॉ. अजित जावकर व प्रतापराव पवार यांच्या पुढाकारातून मायकोसॉफ्ट व बिल गेटस् फांउडेशन यांच्या सहभागातून वॉशिंग्टन नंतर जगातील दुसरे सेंटर ऑफ एक्सलेन्स ऑफ फार्म व्हाईब्जची निर्मीती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट इथं करण्याची घोषणा मायकोसॉफ्टचे कार्यकारी संचालक डॉ. रणवीर चंद्रा यांनी केली होती.
ऊस शेती राज्याच्या अर्थकारणाचा कणा : ऊस शेती हि महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा कणा मानली जाते. त्यामुळं पहिल्या टप्प्यात ऊस शेतीवर अधिक लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा व उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, प्लॉट मॅपिंग, स्वंयचलित हवामान केंद्राचा व आयओटी सेन्सर प्रणालीचा उपयोग, खतव्यवस्थापन व पाणी देण्याची प्रणालीचा शास्त्रशुध्द वापर, जमिनीची सुपिकता व इतर घटकांची नियमित तपासणी, किड व रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत व हवामानातील बदलांचा पिकावर होणारा दूरगामी प्रभाव कमी करणं, दर्जेदार ऊस रोपवाटिका व्यवस्थापनासाठी व ऊस शेतीमधील उत्पादन वाढीसाठी उपग्रह प्रणाली आधारित उपाय योजना, कॉझल स्वयंचलित मशिन लर्निंग अल्गोरिदम तंत्रज्ञान व रियल टाइम मॉनीटरिंग असं एआय तंत्रज्ञान वापरणं अशा बाबी प्रत्यक्षपणे राबविण्यात येणार आहेत.
काय म्हणाले शरद पवार : आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा प्रभावी वापर करुन कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी ऊस शेती कशी करता येईल यावर या प्रकल्पात काम होणार आहे. लहरी हवामानाचा फटका बसू न देता, खत व पाण्याचा सुयोग्य वापर करुन, कमी खर्चात अधिक टनेज व अधिक साखर उतारा देणाऱ्या ऊस पिकाची निर्मिती राज्यात करण्याचा प्रयत या प्रकल्पातून केला जाणार आहे. याबरोबरच आर्टिफिशियल इंटेलिजेन्स ऊस शेती व्यतिरिक्त फळबाग व भाजीपाला शेतीलाही उपयोगी ठरेल असा संशोधकांचा विश्वास आहे. येणा-या काळात हे संशोधन कृषी क्षेत्रात मैलाचा दगड ठरून कांती आणेल असा विश्वास असल्याचं यावेळी शरद पवार म्हणाले.
हेही वाचा :