कोल्हापूर Cucumber Farming Success Story : केल्यानं होतं रे.. आधी केलं पाहिजे.. या उक्तीप्रमाणं चर्चा करत राहण्यापेक्षा प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यास यश नक्कीच मिळतं. याचाच प्रत्यय कोल्हापूरातील दोन भावंडांना आलाय. पारंपरिक ऊस शेतीला फाटा देत कोल्हापूर जिल्ह्यातल्या पट्टणकोडोली येथील दोन भावंडांनी वडिलोपार्जित 56 गुंठे शेतीत नामधारी काकडीचं उत्पन्न मिळवलं. ऐन पावसाळ्यातही या काकडीला मुंबई, पुणे, कोल्हापुरातील मोठ्या हॉटेल व्यवसायिकांकडून मागणी वाढल्यानं दिवसाआड 500 ते 600 किलो काकडीच्या उत्पन्नातून महिन्याकाठी या भावंडांना लाखोंचं उत्पन्न मिळतं. कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे राहणाऱ्या आदिनाथ खड्ड आणि कुंतीनाथ खड्ड या दोन्ही भावंडांनी ही कमाल केलीय. पाहुयात त्यांची यशोगाथा....
हातातोंडाशी आलेलं पीक उध्वस्त : आदिनाथ व कुंतीनाथ दोघांनीही दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. यानंतर दोघांनाही शेतीत आवड असल्यामुळे शेती करायला सुरूवात केली. यासोबतच जोडधंदा असावा म्हणून प्रिंटिगचंही ते काम करतात. मात्र, शेतीकडे ते मुख्य व्यवसाय म्हणून पाहतात. त्यांच्याकडे असलेल्या एकूण 56 गुंठे शेतीमध्ये ते पूर्वी पारंपरिक पीक म्हणून ओळख असलेल्या उसाची लागवड करायचे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्याला 2019 आणि 2021 ला महापुराचा फटका बसला. या महापुरात अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक वाहून गेलं. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये हे दोन्ही भावंडं देखील होते. महापुरात त्यांच्या शेतात कित्येक दिवस पाणी साचल्यामुळे हातातोंडाशी आलेलं त्यांचंही उसाचं पीक उध्वस्त झालं. या महापुरात दोन्ही भावंडांचं मोठं नुकसान झालं.
नफा मिळेल या आशेनं टोमॅटोची लागवड : दोन्ही भावंडांचं दुसऱ्यांदा भरून न निघणारं मोठ नुकसान झालं. पारंपरिक ऊस शेती सोडून नवीन पालेभाज्यांची शेती करायचा निर्णय या दोन्ही भावंडांनी घेतला. मात्र, पालेभाज्यांच्या शेती संदर्भात त्यांना कोणतीही माहिती नसल्यानं त्यांनी याच गावातील अनुभवी पालेभाज्यांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सल्ला व मार्गदर्शन घेतलं आणि टोमॅटो पिकाचं उत्पन्न घ्यायचं ठरवलं. दोन्ही भावंडांनी 56 गुंठ्यात टोमॅटो पिकाची लागवड केली. यासोबतच कोबी आणि काकडी या आंतर पिकांची देखील त्यांनी लागवड केली. मात्र, कधी नव्हे ते कोल्हापुरात वाढलेलं तापमान जिथे माणसाच्या अंगाची लाही लाही होत होती, अशा परिस्थितीत पिक देखील जीव सोडू लागलं होतं. उन्हाळ्यात टोमॅटोचे दर गगनाला भिडले होते. यामुळे टोमॅटोमधून त्यांना मोठा नफा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, उन्हाने या दोन्ही भावंडांचा घात केला. मोठ्या कष्टानं लावलेलं टोमॅटोचंही पीक वाळून गेलं. तर कोबीनं देखील त्यांची साथ दिली नाही. यामुळे दोन्ही भावंडांचं दुसऱ्यांदा भरून न निघणारं मोठं नुकसान झालं.
तिसऱ्यांदा निसर्गानं दिली साथ : अशा परिस्थितीत दोन्ही भावंडांच्या मनात निराशा निर्माण झाली. मोठ्या प्रमाणात डोक्यावर कर्ज साठल्यामुळे काय करावं दोन्ही भावंडांना सुचत नव्हतं. मात्र, या सर्व घटनेत त्यांना काकडी या आंतरपीकानं फायदा होत असल्याचं निदर्शनास आलं. यामुळे त्यांनी पुन्हा एकदा निसर्गाशी झुंजायचं आणि काकडीचं उत्पन्न घ्यायचं ठरवलं. दोन्ही भावंडांनी पावसाळ्यात चालणारी नामधारी काकडी या नवीन जातीचं उत्पन्न घेण्यास सुरुवात केली. सुरुवातील संपूर्ण जळालेलं टोमॅटोचं पीक त्यांनी शेतातून काढून टाकलं आणि 56 गुंठे असलेल्या शेतात नांगरणी करून कंपोस्ट खत घातलं. यानंतर 4 फुटांच्या सरी सोडून, कमी पाण्यात पीक वाढावं यासाठी मिलचींग अंथरले तर प्रत्येकी सव्वा फूट जागा सोडून काकडीची पेरणी केली. यावेळी मात्र, निसर्गाने त्यांना साथ दिली आणि त्यांच्या या कष्टाला अखेर यश आलं.
एक लाख ते सव्वा लाख रुपयांचा फायदा : पीक चांगल्या पद्धतीनं वाढू लागलं. पीक लावल्यापासून 35व्या दिवशी याचे उत्पन्न सुरू झालं. दर एक दिवसाआड या पिकाची तोडणी करत असून 500, 600 किलो काकडी रोज निघत आहे. विशेषतः पाणीदार आणि चविष्ट या काकडीला कोल्हापूरसह कोकण, मुंबई या भागांमध्ये आणि विशेषतः हॉटेलमध्ये मोठी मागणी आहे. 20 किलोचे पॅकिंग करून ती काकडी कोल्हापूरच्या मार्केट यार्ड येथे विकत आहेत. यातून त्यांना सर्व खर्च वजा करून एक लाख ते सव्वा लाख रुपयांचा फायदा झाला असून पुढे आणखी फायदा होईल, अशी अपेक्षा या दोन शेतकरी भावंडांनी व्यक्त केली.
हेही वाचा