मुंबई Gokul Dudh Sangh : राज्यात मोठ्या प्रमाणावर दुधाचं उत्पादन होत आहे. महाराष्ट्रातील अनेक सहकारी दूध संघ अमूल, नंदिनीसारख्या मोठ्या सहकारी दुग्ध व्यवसायांशी स्पर्धा करत आहेत. कोल्हापूर दूध उत्पादक संघ (गोकुळ) हा राज्यातील सर्वात मजबूत दूध उत्पादक संघ मानला जातो. केवळ 800 लिटर दुधानं सुरू झालेला दूध संघ सध्या 18 लाख लिटर दुधाचं संकलन करत आहे. गोकुळ दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सांगितलं की, "गेल्या अनेक वर्षांपासून गोकुळ दूध संघामार्फत ना नफा ना तोटा तत्त्वावर दूध उत्पादकांना सर्वाधिक दर देण्याचा, विविध सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे".
दुग्धोद्योगाकडं सरकारचं दुर्लक्ष : राज्यात दरवर्षी दूध दर आंदोलनासोबतच ऊस दराचं आंदोलन होतं, मात्र राज्य सरकार साखर उद्योगाला जेव्हढं महत्व देतं तेव्हढं महत्व दुग्धोद्योगाला देत नाही. उसाचा हमी भाव निश्चित करून कारखान्यांना हमीभावही दिला जातो. परंतु दुग्ध व्यवसायातील उत्पादकांना कोणत्याही प्रकारची हमी दिली जात नाही. दुधाचा दरही निश्चित केला जात नाही. याबाबत राज्य सरकार उदासीन असून सहकारी दूध व्यवसाय बळकट करण्यासाठी सरकारकडून ठोस पावलं उचलली जात नसल्याचा खंत डोंगळे यांनी व्यक्त केलीय.
महिला, तरुणांना रोजगार देण्याची क्षमता : राज्यातील महिला, तरुणांना रोजगार देण्याची क्षमता डेअरी उद्योगात आहे. शेतीला पूरक रोजगार म्हणून दुग्ध व्यवसाय बळकट करण्यासाठी राज्य सरकारनं त्यासाठी पावलं उचलण्याची गरज आहे. गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून आम्ही आमच्या सदस्यांना ना नफा-ना तोटा तत्त्वावर पशुखाद्य, जनावरांची आरोग्य तपासणी करतो. तसंच राज्यात सर्वाधिक दर गोकुळच्या वतीनं दिला जातो. राज्य सरकारनं 28 रुपये प्रतिलिटर दर निश्चित केला असेल, तर गोकुळ शेतकऱ्यांना प्रतिलिटर 33 रुपये देत आहे. सरकारनं या व्यवसायाकडं गांभीर्यानं पाहण्याची गरज असल्याचंही अरुण डोंगरे म्हणाले.
हे वाचलंत का :