मुंबई Government Scheme : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं घोषणांचा पाऊस सुरू केला आहे. मात्र घोषणांचा एकीकडे सरकार पाऊस पाडत असताना दुसरीकडे निधीचा दुष्काळ असल्यानं अनेक योजना कागदावरच राहत आहेत. सरकारनं गेल्या वर्षी जाहीर केलेली महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य विमा योजना अद्याप निधी अभावी सुरू झाली नसल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे.
अनेक योजनांची घोषणा : राज्य सरकारनं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात माझी लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ कार्य प्रशिक्षण योजना, मुलींना मोफत शिक्षण योजना तसंच अन्य योजनांची खैरात सुरू केली आहे. या योजना कार्यान्वित करण्यासाठी सरकारनं कागदावर निधीची तरतूद केल्याचंही दाखवलं आहे. मात्र राज्य सरकारनं गेल्यावर्षी जाहीर केलेल्या एका महत्त्वाकांक्षी योजनेला निधीच दिला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळं केवळ लोकप्रिय घोषणा करायच्या आणि निधीची पूर्तता करायची नाही अशी परिस्थिती तर निर्माण होणार नाही ना? याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
महात्मा फुले जन आरोग्य विमा योजना : राज्य सरकारनं जून 2023 मध्ये राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विम्याची व्याप्ती दीड लाख रुपयांवरुन पाच लाख रुपये करण्याची घोषणा केली होती. ही योजना राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना लवकरात लवकर लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. आरोग्य विभागानं या योजनेसाठी 2227 कोटी रुपयांचा प्रस्ताव सरकारकडं पाठवला आहे. मात्र, त्याला अद्याप मंजुरी मिळाली नसल्यानं ही योजना अजूनही कागदावरच आहे.
विस्तारित योजना लागू नाही : यासंदर्भात बोलताना आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितलं, सरकारनं जून 2023 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत आरोग्य संरक्षणाची मर्यादा दीड लाख रुपयांवरुन पाच लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सरकारनं शासन निर्णयही 28 जुलै रोजी निर्गमित केला. मात्र, सदर योजना अद्याप अमलात आलेली नाही. सदर विस्तारित योजना सर्व नागरिकांना लागू करण्याकरिता आवश्यक निधी अर्थसंकल्पीत करण्यात आल्याचं सावंत यांनी सांगितलं. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत 2024-25 मध्ये 2812 कोटी रुपये रकमेचा नियत व्यय मागणीचा प्रस्ताव 27 ऑक्टोबर 2023 मध्येच शासनाला सादर करण्यात आला. त्यात 2227 कोटी नियत व्यय मागणी केल्याचं सावंत यांनी सांगितलं. त्यामुळं ही योजना अद्याप लागू करता आलेली नाही.
निविदा प्रक्रिया पूर्ण : दरम्यान ही योजना लागू करण्यासाठी विमा कंपनीची निवड करण्याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. सदर निविदा प्रक्रियेत युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी ही लघुत्तम दरदारक ठरल्यानं या कंपनीला 20 जून 2024 रोजी प्रति कुटुंब वर्ष रुपये तेराशे या विमा दरानं एक वर्ष कालावधी करिता निविदा स्वीकृतीपत्र देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजना अमलात आणण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही प्रगतीपथावर आहे. मात्र अद्याप योजना अमलात आली नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी कबूल केलं.
हेही वाचा :