मुंबई: दक्षिण मुंबईची ओळख ही मूळ मुंबई किंवा उच्चभ्रूंची मुंबई म्हणून सांगितली जाते. मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा असलेला दक्षिण मुंबई हा बहुभाषिक लोकसभा मतदारसंघ आहे. या मतदार संघातील कुलाबा आणि मलबार या परिसरात उच्चभ्रू लोकांची वस्ती आहे. या परिसरात गुजराती आणि मराठी भाषिक मतदार आहेत. गिरगाव, ऑपेरा हाऊस या भागात मराठी मतदारांची संख्या अधिक आहे. उमरखाडी, भायखळा, नागपाडा या परिसरात मुस्लिम बहुल मतदारांची संख्या अधिक आहे. तर वरळी, शिवडी आणि परळ या भागामध्ये मराठी भाषिक मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. एकूणच या मतदारसंघात गुजराती, मराठी, मुस्लिम आणि मागासवर्गीय मतदार अशी रचना आहे.
काय आहेत समस्या? या मतदारसंघात दाटीवाटीची लोकवस्ती आहे. वरळी, परळ, उमरखाडी, नागपाडा, गिरगाव, चिरा बाजार या भागातील उपकर प्राप्त इमारती आणि मोडकळीस आलेल्या इमारती अरुंद गल्ल्या, गलिच्छ परिसर असे चित्र या मतदारसंघात एकीकडे पाहायला मिळते. या मतदारसंघात वरळी कुलाबा मलबार हिल सारख्या उच्चभ्रू वस्तीचा समावेश आहे. असे असले तरीही या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या चाळींचा प्रश्न तसेच अरुंद रस्ते आणि गल्ल्या यामुळे निर्माण झालेल्या वाहतुकीचा प्रश्न हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. या मतदारसंघात सुरू असलेल्या मेट्रो, मोनो आणि कोस्टल रोडच्या कामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
काय आहे निवडणुकीचा इतिहास? या मतदारसंघाच्या निवडणुकीच्या इतिहासाबद्दल विचारले असता राजकीय नेते आनंद गायकवाड म्हणाले की, "हा मतदारसंघ नेहमीच भाषिक समीकरणांच्या आधारावर जिंकला गेल्याचं दिसतं. सत्तरच्या दशकात मुंबईत असलेल्या गिरणी कामगार आणि कष्टकरी मतदारांच्या जीवावर या मतदारसंघात जॉर्ज फर्नांडिस आणि दत्ता सामंत यांच्यासारखे कामगार नेते निवडून आले होते. त्यानंतर मात्र काँग्रेसच्या मुरली देवरा यांनी या मतदारसंघावर आपली पकड मजबूत करून ठेवली होती. या मतदारसंघात असलेल्या गुजराती आणि मुस्लिम मतदारांच्या आशीर्वादावर त्यांनी निवडणुका जिंकल्या आहेत. 1999 च्या निवडणुकीत भाजपाच्या जयवंतीबेन मेहता यांनी देवरा यांचा पराभव केला. मात्र, पुन्हा 2004 च्या निवडणुकीत मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद देवरा यांनी बाजी मारली. 2009 मध्येसुद्धा या मतदारसंघाला परळ, वरळी आणि शिवडी हे मतदार संघ जोडूनही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यामध्ये मराठी माणसाची मते विभागल्यामुळे पुन्हा एकदा मिलिंद देवरा निवडून आले. त्यानंतर झालेल्या 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत मात्र शिवसेनेच्यावतीनं अरविंद सावंत यांनी मतदारसंघ शिवसेनेकडे राखण्यात यश मिळवले आहे."
आगामी निवडणुकीसाठी गणित: 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मात्र आता शिवसेना पक्ष फुटल्यानंतर गणित बदलली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीनं अरविंद सावंत यांना पुन्हा मैदानात उतरवलं जाणार, हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपाच्या महायुतीतर्फे राहुल नार्वेकर यांना मैदानात उतरवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पीयूष गोयल आणि मंगल प्रभात लोढा यांचीही नावे चर्चेत असली तरी या मतदारसंघातील मराठी भाषिकांची संख्या पाहता विद्यमान विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनाच या मतदारसंघात स्थान दिले जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपाला या निवडणुकीत विजयाची अधिक संधी असल्यानं, ही लढत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट विरुद्ध भाजपा अशी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: