बुलडाणा Heavy rain In Buldhana : चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे गावाला पावसासह वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसला. त्यामुळं अनेक घरांचं नुकसान झालं. तसंच घराच्या छताला बांधलेला झोका उडून गेल्यानं एका चिमुकलीचा दुःखद अंत झाला. देऊळगाव घुबे गावाला वादळी वाऱ्यासह पावसानं चांगलंच झोडपलं. त्यामुळं काही काळ वीजपुरवठा खंडित झाला. तसंच अनेक ठिकाणी मोठ-मोठी झाडं उन्मळून पडली. या वादळी वाऱ्यामुळं अनेक घरांचं मोठं नुकसानं झालं आहे.
वादळामुळं सहा महिन्याचं बाळ उडालं : जोरदार वादळामुळं अनेक घरांवरील पत्रे हवेत उडून गेले. तसंच गावातील मातीची घरं, झाडं उन्मळून पडली. देऊळगाव घुबे येथील भरत मधुकर साखरे यांची सहा महिन्यांची मुलगी सई साखरे ही घरात लोखंडी 'अँगल'ला बांधलेल्या झोक्यात झोपली होती. त्याचवेळी वादळानं घरावरील पत्रे लोखंडी अँगलसह उडून गेले. वादळाचा जोर इतका भीषण होता की, पत्रे 200 फुटांवर जाऊन जमिनीवर पडले. त्यामुळं या घटनेत चिमुरड्या सईचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
बुलढाण्याला वादळी पावसानं झोडपलं : हवामान खात्यानं विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसानं झोडपून काढलं. चिखली तालुक्याप्रमाणे सिंदखेडराजा तालुक्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली. किनगाव राजामध्ये मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास वादळी पावसाला सुरुवात झाली. 11 जून रोजी सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसान झालं. सिंदखेडराजा तालुक्यात पावसामुळं अनेक मोठमोठी झाडं उन्मळून पडली, तर काही घरांवरील पत्रे उडून गेले. काही भागात वाहनांचं देखील नुकसान झालं. विदर्भासह बुलढाणा जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा जोरदार तडाखा बसला. वादळामुळं अनेक गावांमध्येही नुकसान झाल्याचं समोर येत आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील कान्सूर येथेही एका व्यक्तीचा मृत्यू झाला. नारायण सुरवसे, असं मृताचं नाव आहे.
हे वाचंलत का :