नागपूर Child Kidnapping Case Nagpur : नागपूर रेल्वे स्टेशनवरून सहा महिन्याच्या बाळाचं अपहरण झाल्याची घटना घडली होती. लोकमार्ग पोलिसांनी अवघ्या काही तासातच चोरीला गेलेलं बाळ शोधून काढत आरोपी महिलेला अटक केली आहे. बाळ चोरी प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी ज्या महिलेला अटक केलेली आहे तिचं नाव सूर्यकांता कोहरे असं आहे.
बाळ चोरी करून महिलेचा पोबारा : अमरावती जिल्ह्यातील राजुरा येथील एक दाम्पत्य ६ महिन्याच्या बाळासह बडनेरा रेल्वे स्टेशनवरून गोंदियाला जायला निघालं होतं. ते रेल्वे स्टेशनवर गाडीची वाट बघत बसलं असताना त्यावेळी तिथं एका महिलेनं दाम्पत्याशी सलगी करण्याचा प्रयत्न सुरू केला. हळूहळू ओळख वाढवली. त्यामुळे त्या दाम्पत्याला देखील त्या महिलेवर अजिबात संशय आला नाही. ते सर्व रात्री उशिरा नागपूरच्या मुख्य रेल्वे स्टेशनवर दाखल झाले. रात्री उशीर झाल्यानं ते दाम्पत्य सहा महिन्याच्या बाळासह स्टेशनवरचं झोपी गेले. त्यावेळी आरोपी महिला देखील तिथे होती. सर्व झोपी गेल्यानंतर आरोपी महिलेने सहा महिन्यांचं बाळ चोरी करून पोबारा केला होता. ही घटना गुरुवारी पहाटे प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर घडली होती.
लोहमार्ग पोलीस झाले अलर्ट : लोहमार्ग पोलिसांना रेल्वे स्टेशनवरून बाळ चोरी झाल्याची माहिती समजल्यानंतर लगेच ३ पथके तयार करण्यात आली होती. बाळाची आई ललिता आणि वडील उमाकांत इंगळे यांच्याकडून घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं महिलेचा शोध सुरू केला गेला. दरम्यान ती महिला बाळाला घेऊन स्टेशन बाहेर पडताना दिसून आली.
सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपीला अटक : लोकमार्ग पोलीस सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असताना ती महिला बाळासह मेमु ट्रेनमध्ये बसल्याचं दिसून आलं. पोलिसांनी तात्काळ चक्र फिरवले असता ती महिला वर्धे जवळील वरुड या रेल्वे स्टेशनवर उतरली असल्याचं समजल्यानंतर लगेच तिचा शोध घेत तिला अटक करण्यात आली आहे.
'या' कारणास्तव बाळाचं अपहरण : अपहरणकर्त्या महिलेला स्वतःची दोन मुलं आहेत; पण ती मुलं तिच्याजवळ राहत नसल्यानं तिनं या बाळाचं अपहरण केल्याचं पोलिसांना सांगितलं आहे.
हेही वाचा :