पालघर Child Pornography : 18 वर्षांच्या आतील मुला-मुलींचे अश्लील फोटो, व्हिडिओ समाज माध्यमावर टाकणे हा कायद्यानं गुन्हा आहे. या गुन्ह्यावर नजर ठेवण्यासाठी देशभर सायबर पोलिसांचा स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. ‘नॅशनल सायबर क्राईम रेकार्ड ब्यूरो’ची नजर सर्व समाज माध्यमावर असून ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’पासून सावध राहा, असा संदेश जणू वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांना मिळालेल्या माहितीतून मिळतोय. माहिती तंत्रज्ञान कायदा 67 ब नुसार लहान मुलांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअपच्या माध्यमातून शेअर करणं हा गुन्हा आहे. कुठल्याही समाज माध्यमावर अशा प्रकारचे व्हिडिओ, प्रतिमा शेअर केली, तर त्यावर ‘नॅशनल सायबर क्राईम रेकॉर्ड ब्यूरो’ चं लक्ष असतं. ज्या भागातून किंवा ज्या माध्यमातून अशा प्रकारचे ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’ शेअर केले, त्या राज्यांना ‘नॅशनल सायबर क्राईम रेकॉर्ड ब्यूरो’ ॲलर्ट करत असते.
चाईल्ड पोर्नोग्राफीच्या माहितीवरुन शोध : संबंधित राज्यातील ‘सायबर क्राईम रेकॉर्ड ब्यूरो’ त्याची माहिती संबंधित जिल्ह्याच्या पोलिस प्रमुखांना कळवत असते. प्रत्येक जिल्ह्यात सायबर पोलीस ठाणे कार्यरत असते. या पोलीस ठाण्याकडे संबंधित जिल्ह्याचे पोलीस प्रमुख केंद्रीय राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी विभागाकडून आलेली माहिती पाठवत असतात. माहिती तंत्रज्ञान कायद्याचा आधार घेऊन कुठल्या भागातून आणि कुठल्या संपर्क क्रमांकावरुन असे ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’ शेअर झाले, त्याचा शोध काम संबंधित जिल्ह्यातील सायबर पोलीस ठाणे घेत असतात.
सहा पोलीस ठाण्यात गुन्हे : पालघर जिल्ह्यात आता अशा प्रकारच्या सूचना महाराष्ट्र सायबर क्राईम कडून आल्यानंतर बोईसर, जव्हार, डहाणू, वाणगाव, तारापूर आणि पालघर अशा सहा पोलिस ठाण्याकडे असे गुन्हे तपासासाठी वर्ग करण्यात आले आहेत. त्यात पालघरमधील दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास चालू असल्याची माहिती वाणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक तुषार पाचपुते यांनी दिली.
लहान मुलांचे अश्लील चित्रण करणे आणि फोटो काढणे कायद्यानुसार गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी दहा वर्षाची शिक्षा आणि पाच लाख रुपये दंड आहे. सायबर क्राईम विभागाची करडी नजर असल्यामुळं कोणीही अशा प्रकारचे गुन्हे करु नयेत. - अनिल विभुते, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे, पालघर
या वर्षी आठ गुन्हे : लहान मुलांचे अश्लील फोटो काढणे, व्हिडिओ चित्रित करणे आणि ते प्रसारित करणे हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. कुठल्याही समाज माध्यमातून अशा प्रकारची ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’ केल्यास त्याची माहिती राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी विभागाला मिळाल्यानंतर ते संबंधित राज्यांना आणि संबंधित राज्यं संबंधित जिल्ह्यांना माहिती देत असतात. पालघर जिल्ह्यात या वर्षी अशा प्रकारचे आठ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील आरोपी तपासाअंती निष्पन्न होतील.
हेही वाचा :