मुंबई Sion Hospital Accident : पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरण ताजं असतानाच शुक्रवारी (24 मे) सायन हॉस्पिटलच्या आवारात हॉस्पिटलचे डीन डॉ. राजेश ढेरे यांच्या कारनं धडक दिल्यानं एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी डॉ. राजेश ढेरे यांच्याविरुद्ध सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा शिर्के यांनी दिली.
नेमकं काय घडलं? : शुक्रवारी सायन हॉस्पिटलाच्या आवारात भरधाव कारनं धडक दिल्यानं एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचं नाव रुबेदा शेख आहे. त्या सायन रुग्णालयात मुंब्र्याहून ड्रेसिंगसाठी आल्या होत्या. शुक्रवारी रात्री सायन हॉस्पिटलाच्या आवारात हा अपघात झाला. तपासादरम्यान हा अपघात हॉस्पिटलचे डीन डॉ. राजेश ढेरे यांच्या कारमुळे झाल्याचं समोर आलं. डॉ. राजेश ढेरे हे सायन हॉस्पिटलमध्ये फॉरेन्सिक मेडिसिन अँड टॉक्सिकोलॉजी विभागाचे प्रमुख असून ते तिथं प्रोफेसर आहेत.
मृत महिलेच्या मुलाची प्रतिक्रिया : मृत महिलेचा मुलगा शाहनवाज शेख यानं ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं की, " आई रूबेदाच्या हाताला जखम झाली होती. त्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर 24 दिवस त्या हॉस्पिटलमध्ये होती. 16 मे रोजी तिला डिस्चार्ज मिळाला. मात्र, ड्रेसिंगसाठी सतत हॉस्पिटलमध्ये जाव लागत असल्यानं वांद्र्यातील नातेवाईकांकडं थांबली होती. शुक्रवारी ड्रेसिंग झाल्यानंतर मुंब्र्याला घरी परतणार होती. आईचा अपघात झाल्यानंतर नातेवाईकांना वाटलं की ती मुंब्र्याला गेली. मला वाटलं की ती वांद्र्याला नातेवाईकांकडं गेली. त्यामुळं रात्री अपघात झाल्यानंतर आम्ही पोहोचू शकलो नाही. मध्यरात्री 3 वाजल्यानंतर पोलिसांचा फोन आला. त्यानंतर आम्ही सकाळी थेट सायन रुग्णालय गाठलं. तेव्हा आईचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली," असं शाहनवाजनं सांगितलं.
डॉक्टर चालकाला अटक : सायन पोलिसांनी या घटनेची चौकशी केली असता महिलेचा सायन हॉस्पिटल ओपीडी बिल्डींगच्या समोर 7.45 वाजेच्या सुमारास कार क्रमांक एम एच 04 एल एक्स 5777 नं अपघात झाल्याचं समोर आलं. याप्रकरणी मृत महिलेचा मुलगा शाहनवाज शेख यानं केलेल्या तक्रारीनंतर, सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सायन हॉस्पिटलचे डीन डॉ. राजेश ढेरे यांना अटक करण्यात आली. तर या गुन्ह्याचा पुढील तपास सायन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगताप करीत आहेत.
हेही वाचा -
- पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग अॅक्शन मोडवर; शहरातील 49 पब आणि बारवर कारवाई - Action Against Pubs And Bar In Pune
- पुणे हिट अँड रन प्रकरण, अल्पवयीन मुलाचा 'तो' व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल - Car Accident Case Pune
- नशेडी कारचालकानं आईसह दीड महिन्यांच्या बाळाला उडवलं; कारचालकानं गुन्हेगारी कनेक्शन, नेमकं काय घडलं? - Hit And Run Case Nagpur