अमरावती Anandeshwar Mahadev Temple : वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आणि अमरावती जिल्ह्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक वैभव असणारं दर्यापूर तालुक्यातील 'लासूर' या छोट्याशा गावात हेमाडपंथी शैलीतलं 'आनंदेश्वर मंदिर' (Anandeshwar Temple) हे जणू एखादं आश्चर्यच. आता श्रावण महिन्यात या मंदिरात भाविकांची आनंदेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी उसळते. या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला छत नाही. परिसरात दूरपर्यंत कुठेही न आढळणाऱ्या काळ्या दगडांनी उभारण्यात आलेल्या मंदिराच्या अगदी मधात मोठा गोलाकार उघडा घुमट असून या गोलाकारातून थेट शिवलिंगावर प्रकाश पडतो. गणपती, श्रीकृष्ण यासह विविध भावमुद्रेतील अनेक मुर्त्या या मंदिराच्या खांबांवर कोरल्या आहेत. चिनी शैलीतील ड्रॅगन देखील या मंदिरात आढळतो. एकूणच हेमाडपंथी शैलीतील या मंदिरासंदर्भात खास श्रावण महिन्याच्या (Shravan 2024) पहिल्या सोमवार निमित्त 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.
अष्टकोनी मंदिराला रथाचे स्वरूप : साडेतीनशे चौरस फुटांचं अतिभव्य बांधकाम असणारं लासुर येथील 'आनंदेश्वर मंदिर' हे अष्टकोनी आहे. हे मंदिर निरखून पाहिले असता हे मंदिर एखाद्या रथासमान दिसतं. एकावर एक दगड रचून उभारण्यात आलेल्या या मंदिराच्या प्रत्येक दगडावर कोरीव काम करण्यात आला. मंदिराच्या आतमधल्या परिसरात एकूण बारा खांब हे उघड्यावर असून भिंतीमध्ये सहा खांब आहेत. एकूण 18 खांबांवर या मंदिराच्या सभागृहाचं अतिशय आकर्षक छत टिकून आहे. अनेकांना या मंदिराचं बांधकाम अर्धवट राहिलं असावं आणि त्यामुळं मंदिराचा घुमट असा उघडा राहिला असावा असं वाटतं. वास्तवात मात्र हेमाडपंथी शैलीचे प्रमुख 'हेमांद्री पंत' यांनी हे मंदिर उभारण्यासाठी वापरलेली ही खास शैली आहे, अशी माहिती इतिहासाचे जाणकार प्रा. डॉ. वैभव म्हास्के यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
कलाकृतींनी सजलं मंदिर : हे मंदिर दुरून पाहतानाच अगदी नजरेत भरतं. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर मंदिराच्या सभागृहालावर छत नाही. छताच्यावर अगदी गोलाकार सारं मोकळं असून वर आकाश दिसतं. आता पावसाळ्यात तर मंदिरावरील ह्या भव्य गोलाकारातून छान पाणी मंदिरात बरसत. या मंदिरातील प्रत्येक दगडावर ब्रम्हा, विष्णू, राधा, कृष्ण यांच्यासह अनेक नर्तकींच्या मुर्त्या कोरलेल्या दिसतात. विशेष म्हणजे काही मुर्त्या ह्या चिनी संस्कृतीमधील आढळतात. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या अगदी खाली दोन्ही बाजूला चिनी संस्कृतीमधील ड्रॅगनचही दर्शन घडतं. या मंदिरावर लागलेल्या प्रत्येक दगडावरील कलाकृती ही पाहणाऱ्याला तिच्या मोहात पाडणारी आणि तितकीच थक्क करणारी आहे.
मंदिराच्या दगडांचं असं आहे वैशिष्ट्य : 'आनंदेश्वर मंदिर' ज्या काळ्या दगडामध्ये उभारण्यात आलं आहे ते दगड 'लासुर' या गावात कुठेच आढळत नाही. लासुरच काय तर अख्या दर्यापूर तालुक्यात हा दगड सापडत नाही. या मंदिरासाठीचा हा बेसॉल्ट खडक लाव्हा रसापासून तयार झाला असून हे दगड मध्य प्रदेशातील बालाघाट डोंगरात आढळतात. बालाघाट डोंगरातील हे दगड नदीतून सुमारे दीड दोनशे किलोमीटर लांब लासुरला जवळपास 1000 वर्षांपूर्वी आणलेत. या दगडांद्वारेच आनंदेश्वर मंदिर उभारण्यात आलं.
आनंदेश्वराच्या दर्शनासाठी श्रावणात गर्दी : अमरावती जिल्ह्यातील उत्कृष्ट पर्यटनस्थळ म्हणून गत दहा-पंधरा वर्षांपासून 'एक हजार वर्ष जुनं आनंदेश्वर मंदिर' नावारूपास आलंय. वर्षभर हे मंदिर पाहण्यासाठी अमरावती सहलगतच्या अकोला जिल्ह्यातून अनेक भाविक येतात. आता श्रावण महिन्यात या मंदिरात येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढणार आहे. पहिल्या श्रावण सोमवारी देखील सकाळपासूनच आनंदेश्वराच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक आलेत.
असा झाला हेमाडपंथी शैलीचा उदय : आज देशभरात अनेक ठिकाणी हेमाडपंथी शैलीतील अनेक मंदिर आहेत. हेमाडपंथी शैलीचा जनक हा यादवांच्या देवगिरी साम्राज्यातील पंतप्रधान हेमांद्री पंत हा आहे. हा हेमांद्री पंत मूळचा अमरावती जिल्ह्यातील सध्याच्या भातकुली तालुक्यात असणाऱ्या खोल्हापूर या गावचा मूळ रहिवासी होता. देवगिरीवर रामचंद्र देवराय या राज्याची सत्ता असताना मोहम्मद खिलजी यान देवगिरीवर आक्रमण केलं. रामचंद्र देवराय याचा पराभव करून मोहम्मद खिलजी यान खंडणी मागितली. पुढे रामचंद्र देवराय यास मोहम्मद खिलजी यांना आपलं मांडलिक बनवून दिल्लीत सन्मान दिला. रामचंद्र यादव यांचा मुलगा शंकर देव यादव राजा झाला. त्याने एक वर्ष मोहम्मद खिलजी यास खंडणी दिली. मात्र नंतर नकार देताच त्याला मोहम्मद खिलजीनं ठार मारलं.
खास शैलीतील शिव मंदिर : यानंतर देवगिरीच्या गादीवर शंकर देवराय राजाचा जावई हरपाल देव यादव हा विराजमान झाला. त्याने देखील खंडणी देण्यास नकार दिला. यामुळं मल्लीक गफूर यानं अवघ्या 500 सैन्यासह देवगिरीवर आक्रमण केलं. हरपाल देव याला ठार मारण्यात आलं. यानंतर देवगिरीचं राज्य संपुष्टात आलं. देवगिरीचा पंतप्रधान म्हणून हेमांद्री पंत याला आपल्या राज्याचा ऱ्हास झाल्याबाबत प्रचंड दुःख झालं. राज्य लयाला गेल्यावर शंकराचा भक्त असणाऱ्या हेमांद्री पंत यानं विदर्भासह महाराष्ट्र आणि दक्षिणेत अनेक ठिकाणी खास शैलीतील शिव मंदिर उभारलीत. लासुर येथील मंदिर देखील एका खास शैलित उभारण्यात आलं. 12 ते 13 व्या शतकादरम्यान हेमांद्री पंतांनी उभारलेली अनेक मंदिर पुढे हेमांद्री पंतांची शैली या शब्दाचा अपभ्रमश होऊन हेमाडपंथी शैली या नावानं ओळखली जाऊ लागलीत.
हेही वाचा -
- सावळापुरात 1861 साली सापडली 'सत्यनारायणाची मूर्ती'; दर्शनासाठी आले होते अक्कलकोटचे 'स्वामी समर्थ', जाणून घ्या मूर्तीचं रहस्य - Satyanarayan Temple
- वर्षाला 21 टन माती चालली वाहून; मातीचा एक इंच थर तयार व्हायला लागतात 100 वर्षे - Soil Erosion Problem Amravati
- साडेतीनशे वर्षांपूर्वी परदेशातील टाइल्स, झुंबरनं सजलं दिगंबर जैन मंदिर; अचलपूरचं आहे ऐतिहासिक वैभव - Jain Temples Amravati