मुंबई Worli Hit and Run Case : रविवारी घडलेल्या वरळीतील हिट अँड रन प्रकरणानंतर त्याच दिवशी नाखवा कुटुंबाची आमदार आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली होती. यानंतर आज पुन्हा एकदा पीडित कुटुंबाची आमदार आदित्य ठाकरे आणि माजी मंत्री अस्लम शेख यांनी भेट घेतली आहे. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी राज्य सरकार, गृहखातं आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
मिहिर शाह राक्षसी वृत्तीचा : या भेटीनंतर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, "मिहिर शाहानं मर्डरच केला आहे. त्यामुळं आरोपी मिहिर शाहला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. नाखवा कुटुंबाची आज आम्ही भेट घेतली. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, हे त्यांच्याकडं बघून दिसत आहे. म्हणून या मुंबईत, महाराष्ट्रात एवढी भयानक घटना घडलेली आहे. नरकातून राक्षस जरी आला तरी एवढं भयानक कृत्य करणार नाही, तेवढं भयानक कृत्य मिहिर शाह याच्याकडून झालेलं आहे." तसंच अपघातानंतर मिहिर थांबला असता तर त्या महिलेचा जीव वाचला असता, पण त्यानं ज्या पद्धतीनं त्या महिलेला फरफटत नेलं. ते अतिशय संतापजनक आहे. या कुटुंबाला मदत आर्थिक मदत वगैरे काही नको. पण आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. मिहिर हा राक्षसी वृत्तीचा आहे. त्याला राक्षसच म्हणावं लागेल, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
गृहखातं काय करतंय : या घटनेच्या 60 तासानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. मी पोलिसांना दोष देणार नाही. पण राज्याचे गृहमंत्री आणि गृहखातं काय करत होतं? आरोपीला पकडण्यास एवढा उशीर का लागला? सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट दिसतंय की आरोपी हा नशेत होता. मग एवढे दिवस तो कुठे लपला होता? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. गृहमंत्री याच्यावर बोलत नाहीत. ते का बोलत नाहीत समजत नाही. मात्र आता अटक झाल्यानंतर आरोपीवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
देशातील कठोर शिक्षा झाली पाहिजे : जिथं अनधिकृत बांधकाम आहे, त्याच्यावर हे सरकार बुलडोझर चालवत आहे. परंतु मिहिर शाह याच्यावर बुलडोझर कधी चालणार? किंवा त्याच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार? असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसंच देशातील जी कठोर शिक्षा आहे, ती शिक्षा या मिहिर शाहला झाली पाहिजे. कारण हे हिट अँन्ड रनचं प्रकरण नसून, हा त्यानं मर्डर केलेला आहे. हत्या केलेली आहे, त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आज आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन केल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.
हेही वाचा :