मुंबई Sanjay Raut : पुण्यात अल्पवयीन आरोपीनं मद्यपान करुन सुसाट गाडी चालवत दोघांचे बळी घेतले. यानंतर याप्रकरणी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं असताना, आज शिवसेनेकडून (ठाकरे गट) या प्रकरणी सरकारवर काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या अपघातातील अल्पवयीन आरोपीला आणि त्यांच्या कुटुंबीयांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री तसंच सरकारमधील मंत्री आणि महायुतीतील काही नेते यंत्रणाचा दुरुपयोग करत असल्याचा घणाघाती आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. त्यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधानांनी ED ला हाताशी धरलं : यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, "देशात सत्ताधारी भाजपा पक्षाकडून विरोधकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करुन विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात डांबलं जातय. अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकलं गेलं. मीही तुरुंगातून बाहेर आलोय. परंतु आम्ही घाबरणारे नाही. आम्ही लढणार आहोत आणि जे सत्य आहे ते बोलणारे आहोत."देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ईडीला हाताशी धरुन विरोधकांना नामोहरम करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय.
देशात 4 जूननंतर चक्रं फिरतील : लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे. आज अंतिम आणि सातव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. परंतु, 4 जूननंतर देशात सत्तांतर होईल, भाजपा सरकार जाऊन इंडिया आघाडीचं सरकार येईल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. राहुल गांधी हे आमचे नेते आहेत आणि राहुल गांधी यांच्यासोबत संपूर्ण देशातील लोक आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
27 कॅमेरे लावून ध्यानधारणा : लोकसभा निवडणूक प्रचाराची धामधूम संपल्यानंतर विश्रांती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीला जाऊन ध्यानधारणा करत आहेत. यावर संजय राऊत यांनी सडकून टीका करत म्हटलंय की, "मोठी सुरक्षा यंत्रणा आणि 27 कॅमेरे लावून पायाच्या नखांपासून ते डोक्याच्या केसांपर्यंत कॅमेरा लावत कोणी शूटिंग करुन ध्यानधारणा करत असतं का?" तसंच फक्त दिखाव्यासाठी मोदी ध्यानधारणा करत आहेत. मोदी ड्रामा करत असल्याची टीकाही संजय राऊत यांनी केली.
सत्याच्या आधारावरच लिहिलं : लोकसभा निवडणुकीत मतदानावेळी राज्यात अनेक ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी पैसे वाटल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. एका-एका मतदारसंघात पंचवीस ते तीस कोटी रुपये वाटले असं मी सामनातून लिहिलं आहे. मी जे सामनातून लिहिलं ते सत्याच्या आधारावरच लिहिलं होतं. परंतु, यावर बेकायदेशीर मुख्यमंत्री यांनी नोटीस पाठवलीय. आम्ही नोटिशीला घाबरत नाही. त्यांना उत्तर देऊ, परंतु जे सत्य आहे ते मी बोलणारच. पैशाचा बाजार या लोकांनी मांडलाय, हे नाकारता येणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.
निवडणूक आयोगाचा अंधा कानून : खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावरही बोचरी टीका केली. निवडणूक आयोगाचं असं आहे की, सत्ताधाऱ्यांना एक न्याय आणि विरोधकांना वेगळा न्याय, असं न्यायदान निवडणूक आयोगाचं आहे. सध्या निवडणूक आयोगानं डोळ्यावर पट्टी बांधली आहे. निवडणूक आयोगाचा कारभार म्हणजे अंधा कानून असल्याची टीका संजय राऊत यांनी कोलीय.
हेही वाचा :