मुंबई Abhishek Ghosalkar Shot Dead : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी रात्री गोळीबार करण्यात आलाय. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. दहिसरमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, घोसाळकरांच्या दिशेनं पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्यानं त्यांची प्रकृती चिंताजनक होती. गुरुवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला आहे.
आरोपीचाही मृत्यू : अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरोन्हा हे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यात काही वैयक्तिक वाद झाले होते, पण ते मिटल्यानं ते एकत्र आले होते. अभिषेक यांना मॉरिसनं स्वतःच्या कार्यालयात बोलावलं आणि फेसबुक लाईव्हही केलं. त्यावेळी या दोघांनीही एकमेकांचं कौतुक केलं. हे लाईव्ह सुरू असतानाच मॉरिस हा उठला आणि त्यानं अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर मॉरिस यानेसुद्धा स्वत: वर गोळ्या झाडल्या. यात मॉरिसचा मृत्यू झालाय.
फेसबुक लाईव्हमध्ये गोळीबार : ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय. दहिसर येथील कार्यालयात मॉरिसभाई नावाच्या व्यक्तीनं अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केलाय. या गोळीबारात अभिषेक यांच्यावर दोन-तीन गोळ्या झाडल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, या हत्येचा थरार फेसबूकवरून लाईव्ह करण्यात आला आहे. मॉरिसभाई यानेच त्याच्या फेसबुकवरून हे लाईव्ह केलं होतं.
फेसबुक लाईव्हदरम्यान काय घडलं? : अभिषेक घोसाळकर यांनी मॉरिसभाई नावाच्या व्यक्तीबरोबर फेसबुक लाईव्ह केलं होतं. मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांना त्यांच्याच कार्यालयात एका कार्यक्रमाकरता बोलावलं होतं. यानिमित्ताने ते फेसबुक लाईव्हवरून संवाद साधत होते. संवाद संपल्यानंतर सुरुवातीला मॉरिस उठून निघून गेला. त्यानंतर, अभिषेक घोसाळकर लाईव्हद्वारे संवाद साधत होते. संवाद झाल्यानंतर अभिषेक घोसाळकरही जागेवरून उठले. ते उठताच त्यांच्यावर गोळीबार झाला. ते उठून गेल्यानंतर गोळ्यांचा आणि ओरडण्याचा आवाज व्हिडिओतून येत आहे.
हेही वाचा -