मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या विरोधात निवडून येऊन दाखवावं, असं आव्हान दिलं होतं. "आदित्य ठाकरे यांना आता कंठ फुटला आहे. त्यांनी राज्यातील कुठल्याही मतदार संघात उभं राहून दाखवावं. आमचा साधा शिवसैनिक सुद्धा त्यांचं डिपॉझिट जप्त करेल. त्यामुळे त्यांनी निवडणुकीत जिंकण्याची भाषाच करू नये," असं आव्हान शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी दिलं आहे.
आजोबांच्या नावावर किती काळ जगणार : "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर आणखीन किती काळ जगणार आहात? हिम्मत असेल तर त्यांनी वांद्रे येथून लढून दाखवावं. सावरकरांचा अपमान सातत्यानं करायचा आणि हिंदुत्व सोडून बोलायचं. त्यामुळे आता ते कॅपॅबल नाहीत, असं पावसकर म्हणाले. "त्यांचा पक्ष सोडून गेलेल्यांवर राग आहे. मात्र, त्यांनी तो राग जनतेवर काढू नये. जे मुख्यमंत्री असताना सहाय्यता निधी वापरू शकले नाहीत. त्यांनी मोठ्या बाता मारू नयेत", असा टोलाही त्यांना उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
कंत्राटदारांच्या जीवावर जडणघडण : "आदित्य ठाकरे आणि कुटुंबाची जडणघडण कंत्राटदारांच्या जीवावर झाली आहे. काहीजण सरकारच्या विरोधात नाही. तर जनतेच्या विरोधात काम करत आहेत. कोस्टल रोडवरून राजकारण करायचा प्रयत्न केला. या रोडमुळे जनसामान्यांना फायदा होणार आहे. मात्र, यांच्या पोटात दुखण्याचं कारण काय? वरळीतील कोळी बांधवांनी यासाठी लढा दिला आहे. ते न्यायालयात गेले. या कामासाठी तीन वर्ष ती माणसं कामासाठी रखडली. मुख्यमंत्री शिंदे यांनी ती कामे मार्गी लावली. त्यांना नुकसान भरपाईसुद्धा दिली," असंही पावसकर म्हणाले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या पूर्ण केल्या : "मराठा समाजाला दिलेल्या वचनाप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या आहेत. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणं महत्त्वाचं होतं. मुख्यमंत्र्यांनी ते मिळवून दिलं. विधेयक मंजूर केल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी त्याला विरोध दर्शवला. मात्र, शिंदे यांनी सर्वांशी बसून विचार करूनच हा निर्णय घेतला," असे शिदें गटाचे प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा :
1 शेतकरी आंदोलकांच्या हल्ल्यात 12 जवान जखमी, एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा दावा
3 अजित पवारांच्या विरोधात पुतण्या राजकीय मैदानात, प्रथमच राजकारणातील प्रवेशावर मांडली स्पष्ट भूमिका