कोल्हापूर Shivrajyabhishek Din 2024 : कोल्हापुरातल्या नवीन राजवाड्यासमोर 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा (Chhatrapati Shivaji Maharaj) पार पडला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्या वतीनं दुर्गराज रायगडावर माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्या पुढाकारानं राज्याभिषेक सोहळा पार पडला. तर कोल्हापूर येथे नवीन राजवाड्याच्या प्रांगणात सनई चौघड्याच्या वादनाने शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरूवात झाली होती. यानंतर आठ वाजता झांज पथक आणि साडेआठ वाजता मराठा लाइट इन्फंट्री बँड बेळगाव यांचं सादरीकरण झालं.
मर्दानी खेळांचा थरार : सकाळी नऊ वाजता शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुवर्णमूर्तीवर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि याज्ञसेनीराजे छत्रपती महाराणीसाहेब, मालोजीराजे छत्रपती, मधुरीमाराजे छत्रपती, यशस्विनीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती यांच्यासह करवीर जनतेच्या उपस्थितीत अभिषेक करण्यात आला. या सोहळ्यानंतर पोवाडा, शौर्य गीत, मराठी स्फूर्ती गीत आणि मर्दानी खेळांचा थरार देखील अनुभवायला मिळाला.
शिवरायांची सुवर्णमूर्ती मुख्य आकर्षण : स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवरायांच्या चांदीच्या मूर्तीवर जलाभिषेक करून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. तर कोल्हापुरात पहिल्यांदाच करवीर संस्थानातील नवीन राजवाडा येथे साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवरायांच्या सुवर्णमूर्तीवर जलाअभिषेक करण्यात आला. शिवरायांची ही सुवर्णमूर्ती करवीरकरांचे मुख्य आकर्षण ठरली.
ढोल ताशांचा गजर : पहिल्यांदाच कोल्हापुरातील ऐतिहासिक नवीन राजवाडा येथे शिवराज्याभिषेक दिन होत असल्यानं या सोहळ्याला मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात जुना राजवाडा येथे शिवराज्याभिषेक दिन झाला.
यंदा राजवाड्यावर अभूतपूर्व उत्साह : दोनच दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत शाहू छत्रपती विजयी झाले आहेत. लोकसभा विजयानंतरचा हा पहिलाच राज्याभिषेक सोहळा असल्यानं यंदा नवीन राजवाड्यावर अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. नवनिर्वाचित खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या शिवराज्याभिषेक सोहळ्याला राज्याबाहेरील पाहुणे उपस्थित होते. यावेळी करवीर गर्जना पथकाच्या वतीनं झांजपथकाच्या निनादात हा शिवराज्याभिषेक सोहळा झाला.
हेही वाचा -