मुंबई Shiv Sena Foundation Day 2024 : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रबोधनकारांच्या सुचनेनुसार 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना केली. गेल्या 58 वर्षांत शिवसेनेत अनेक स्थित्यंतरं झाली. यात महत्वाचं म्हणजे डाव्यांना संपवण्यापासून डाव्यांसोबत शिवसेनेचा झालेला प्रवास स्वागतार्ह असल्याचं डाव्या चळवळीचे नेते विश्वास उटगी यांनी म्हटलंय. शिवसेनेनं 1970 मध्ये आमदार कॉ. कृष्णा देसाई यांचा खून करून कॉंग्रेसला मदत केल्याचा आरोप आहे. तसंच त्यांनी डाव्यांना संपवण्याचा काम केलं असं म्हटलं जातं. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक निवडून आले.
विधानसभेत शिवसेनेचा पराभव : 1978 मध्ये शिवसेनेनं विधानसभा निवडणूक लढविली. मात्र, शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नाही. 1975 मध्ये इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली. त्या आणीबाणीला बाळासाहेबांनी अघोषित समर्थन दिलं होतं. त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसून आला. केंद्रात इंदिरा गांधी यांचा, तर महाराष्ट्रात शिवसेनेचा पराभव झाला होता. यातच 1973 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे 40 नगरसेवक निवडून आले होते. मात्र, विधानसभेत झालेली वाताहत लक्षात घेऊन शिवसेनाप्रमुखांनी ही निवडणूक हरलो, तर शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा देईन, असं जाहीर करत राग व्यक्त केला होता. 1978 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला फक्त 22 जागा मिळाल्या. परिणामी महापालिकेतील सत्ता गेली. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर शिवसैनिकांनी बाळासाहेबांची मनधरणी केली. काहींनी तर तुम्ही राजीनामा दिला, तर आमच्या प्रेतावरून जावं लागेल, असा पवित्रा घेतला. मात्र बाळासाहेब ठाम होते. त्यानंतर शिवसैनिकांनी महापालिकेतील भगवा कधीच खाली पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही बाळासाहेबांना दिली. तेव्हाच बाळासाहेबांनी आपला राजीनामा मागं घेतला.
1985 पासून पालिकेत सत्ता : 1985 साली झालेल्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला शब्द शिवसैनिकांनी पाळला. 1985 साली शिवसेनेचे महापौर म्हणून छगन भुजबळ विराजमान झाले. त्यानंतर दत्ता नलावडे, रमेश प्रभू, सी. एस. पडवळ, शरद आचार्य, दिवाकर रावते, मिलिंद वैद्य, विशाखा राऊत, नंदू साटम, हरेश्वर पाटील, महादेव देवळे, दत्ता दळवी, शुभा राऊळ, श्रद्धा जाधव, सुनील प्रभू, स्नेहल आंबेकर, विश्वनाथ महाडेश्वर ,किशोरी पेडणेकर यांनी शिवसेनेची महापालिकेतील सत्ता अबाधित ठेवली. 1992 ते 1996 या चार वर्षांचा अपवाद वगळता मुंबईचं महापौरपद शिवसेनेनं राखलं.
शिवसेनेची वाटचाल डाव्यांसोबत : शिवसेनेची सुरूवात डाव्यांना विरोध करून झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शिवसेनेनं डाव्यांचं मुंबईतील वर्चस्व मोडून काढीत काढलं होतं. त्यावेळी कॉंग्रेसचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यासाठी शिवसेना काम करते, असा आरोप करण्यात आला होतो. शिवसेनेला 'वसंत'सेना देखील काहींनी म्हटलं होतं. मात्र, डाव्यांना संपवण्यात शिवसेनेनं पुढाकार घेतला होता. मात्र, पंचावन्न वर्षानंतर शिवसेनेनं डाव्यांसोबत जुळवून घेतलंय. शिवसेनेच्या पुढच्या पिढीनं पक्षफुटीनंतर डावेच काय मुस्लिमांनाहीसोबत घेतलंय. कट्टर हिंदुत्वाकडून सर्वसमावेशक असा शिवसेनेचा प्रवास, राजकीय दृष्टीकोन कसा बदलला आहे, हे दिसून येतं, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक उदय तानपाठक यांनी व्यक्त केली आहे.
शिवसेना प्रबोधनकारांच्या वाटेवर : या संदर्भात बोलताना डाव्या चळवळीचे नेते ॲड. विश्वास उटगी म्हणाले की, "शिवसेनेचा जन्म हा मराठी माणसाच्या हितासाठी झाला होता. प्रबोधनकार ठाकरे तसंच प्र. के. अत्रे यांनी शिवसेनेच्या जन्मात महत्त्वाची भूमिका बजावली होती. कालांतरानं हिंदुत्वाच्या विचारासाठी शिवसेना, असं समीकरण पुढं आलं. मात्र, गेल्या पन्नास वर्षात शिवसेनेचं राजकारण पाहिल्यास ते हिंदुत्वाला समर्थन देणारंच होतं. पण आता भारतीय जनात पक्ष अन्य पक्षांना संपवणार पक्ष असल्याचं शिवसेनेच्या लक्षात आलं आहे. भाजपाची मातृसंस्था असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अत्यंत विषारी प्रचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेला संघ आहे. संघ माणसात द्वेष पसरवण्याचं काम करत आहे. हे थांबवायचं असल्यास धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षांनी एकत्र यायला हवं. हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी इंडिया आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यांचा हा निर्णय अतिशय स्तुत्य असून डाव्यांना एकेकाळी संपवणाऱ्या शिवसेनेनं आता डाव्यांना सोबत घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडून चांगली पावलं उचलली जात आहेत. डाव्या विचारांच्या लोकांनीसुद्धा आता मंथन करण्याची गरज आहे. सर्वांनी एकत्र राहून देशाच्या हिताचा विचार केला पाहिजे."
'हे' वाचलंत का :