मुंबई - २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १०५ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष भाजप ठरलेला असतानाही राज्यात झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर भाजपा नेतृत्वाने शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदी विराजमान केलंय. परंतु आता राजकीय समीकरणे पूर्णत: बदलली असल्याने २०२४ च्या निवडणुकीला सामोरे जाताना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार याबाबत महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये चुरस लागलीय. अशात महायुतीत मुख्यमंत्रिपदाचा चेहराच नाही, असा आरोप विरोधक करत असताना शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, असे आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केलंय. मुंबईत महायुतीच्या झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच : महायुती सरकारने त्यांच्या सव्वा दोन वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कामांचा लेखाजोखा रिपोर्ट कार्डच्या माध्यमातून मुंबई झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाशित करण्यात आलाय. याप्रसंगी महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात केल्या गेलेल्या कामांची चिरफाडही केलीय. विशेष म्हणजे मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी शिवसेना आणि भाजपाची युती उद्धव ठाकरे यांनी तोडल्याचा राग आजही देवेंद्र फडवणीस यांच्या मनात आहे आणि आजही उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी दिल्लीवारी करत असल्याचा आरोपही महायुतीकडून केला जातोय. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्यासाठी शंखनाद झाला असून, काहींसाठी ऐलान आहे. सत्ता पक्षाला मुख्यमंत्रिपदाची चिंता अजिबात नाही. पण पवार साहेबांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा सांगावा. आमचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले असून, बोटावर मोजण्या इतक्या जागा शिल्लक राहिल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. तसेच ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जागावाटपाचा फॉर्म्युला अधिकृतपणे सांगितला जाईल, असेही फडणवीस म्हणालेत.
मनोज जरांगे पाटलांनी विचार करावा : राज्यात आचारसंहिता सुरू झाली असून, मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप कायम आहे. मराठा नेते, मनोज जरांगे पाटील सातत्याने देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर आरोप करीत आहेत. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत की, मी स्वतः मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भर सभेत शपथ घेतलीय. या अगोदर देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलंय. पण दिलेले आरक्षण महाविकास आघाडीला टिकवता आलं नाही. कुणबी समाजाला आम्ही प्रमाणपत्र दिलीत. मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत विचार केला पाहिजे. आम्ही त्यांच्यासाठी आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय काय केलं आहे. महाविकास आघाडीने त्यांच्यासाठी काय केलंय? याचा विचार मनोज जरांगे पाटील यांनी करावा, अशा स्पष्ट शब्दात सांगत मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे मनोज जरांगे पाटलांना तंबी दिलीय.
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात योग्य अँगलने शोध : राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. याबाबत विरोधी पक्षाकडून गृहमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली आहे. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्यांचे गृहमंत्री जेलमध्ये गेले, उद्योगपतींच्या घरासमोर ज्यांनी बॉम्ब ठेवले, हे प्रकरण उघडकीस येण्याची शक्यता लक्षात येताच मनसुख हिरेनला ज्यांनी मारून टाकले. ज्यांनी पत्रकारांवर अन्याय केले. त्यांना जेलमध्ये टाकले. तेच आता आम्हाला कायदा सुव्यवस्था सांगणार का? असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केलाय. यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात आरोपी कुणीही असो त्याला शिक्षा होईलच. या घटनेत त चार-पाच अँगलने तपास होत असून, तपास पूर्ण झाल्यावर याबाबत योग्य माहिती पोलीसच देतील, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
हेही वाचा-