पुणे Sharad Pawar : आज पुण्यामध्ये पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून आयोजित करणाऱ्या वार्तालापमध्ये शरद पवार यांनी विविध प्रश्नांवर दिलखुलास उत्तरे दिली. जोरदार राजकीय फटकेबाजी सुद्धा केली. राज्यात, देशाच्या राजकारणात महत्त्वाची पदं भूषवणाऱ्या शरद पवार यांनी आजच्या पत्रकारितेसंदर्भात महत्त्वाचं भाष्य केलं.
ज्याप्रमाणे मिडीया बदलत चालला आहे. त्याप्रमाणे मतदारांचा कलही बदलत चालला आहे. त्याचा आगामी राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो असा सवाल विचारण्यात आला. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, 'सिरीयस' पत्रकारिता करणारे जे पत्रकार आहेत, त्यांनी निवडणुकांसदर्भात जे लिखाण केलं आहे. त्याचा नक्की चांगला परिणाम होणार आहे. त्याचा परिणाम आमच्यावर होतो आणि जनतेवरही होतो.
अदृश्य शक्ती लिहायला भाग पाडते - शरद पवार म्हणाले, "ज्यावेळी तुम्ही खास अंक काढता. ते अंक काढत असताना तुमचा सर्व्हे हा ऑथेंटिकेट पीचवरचा आहे, त्यासाठी तुम्ही काय काळजी घेतली, जे कष्ट घेतले, हे जर स्पष्ट असेल तर त्याचा नक्कीच चांगला परिणाम मतदारांवर होतो. ते अंक आमच्यासारखे लोकही अगदी सिरीयसली वाचतात. पण अलीकडच्या काळात काहीवेळला असे जाणवते की, वृत्तपत्रात येणाऱ्या ठळक बातम्या आणि लिखाणांमध्ये ही अदृश्य शक्ती आहे. ही शक्तीच त्यांना लिहायला भाग पाडते. पण सत्य आम्हालाही माहिती असते, त्या सूचना कुठून आलेल्या असतात."
जयंत पाटील यांच्या पराभवावरही भाष्य - यावेळी शरद पवार यांनी विधानपरिषदेतील शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या पराभवावरही भाष्य केलं. उद्धव ठाकरे यांनी तिसरा उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला. आम्ही आमची 12 मतं शेकापला देणार असल्याचं कळवलं होतं. बारामती लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, सुसंवाद कायम ठेवला तर लोक कधीही विसरत नाहीत. सुप्रिया सुळेंचा मतदारांशी सुसंवाद होता. त्यांना मतदान होणार याची मला खात्री होती. नागरिकांना सुसंवाद ठेवणार नेता भावतो. पण एकाच घरात किती सत्तापदे द्यायची याचा मतदारांनीच विचार करायला हवा.
मराठा समाज आणि ओबीसींमध्ये मतभेदांची दरी - दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली. तर आदल्याच दिवशी छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर बोचरी टीका केली होती. त्यानंतर सोमवारी छगन भुजबळ अचानक शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले. पवार त्यावेळी झोपले होते. त्यामुळे छगन भुजबळ यांना तासभर तिष्ठत थांबावं लागलं. छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यासोबत राज्यात गंभीर बनलेल्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा केली. मराठा समाज आणि ओबीसींमधील मतभेदांची दरी दूर करण्यासाठी पवारांना त्यांनी आवाहन केलं. आज पुणे श्रमिक पत्रकार संघात वार्तालाप करताना शरद पवार यांनी या विषयावर भाष्य केलं. “भुजबळ म्हणाले, झालं गेलं सोडून द्या, मार्ग काढावा लागेल. नाहीतर महाराष्ट्रात वाद वाढतील. स्पष्ट सांगायचं म्हणजे या लोकांनी जी विधाने केली ती वाद वाढायला मदत करणारी होती. मार्ग काढायचा असेल तर राज्यकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. राज्यकर्त्यांनी कितपत ही भूमिका घेतली माहीत नाही. तसं दिसलं नाही”.
बाकीच्या गोष्टी विसरून पुढे जाऊ - "जरांगेंना काय कमिटमेंट दिल्या, कोणत्या गोष्टीची पूर्तता केली आणि काय करणार आहात, ते जरांगेंना सांगा. ओबीसींना त्यांच्या हिताची काही कमिटमेंट केली ती माहिती आम्हाला द्या. त्यातून काही चांगलं निघत असेल तर तुमची धोरणं दुरुस्त करून, बाकीच्या गोष्टी विसरून पुढे जाऊ, आज शांततेची गरज आहे” असं शरद पवार म्हणाले.
'हे' वाचलंत का :