पुणे School First Day : उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून आजपासून शाळेच्या घंटा पुन्हा खणाणल्या आहेत. आजपासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरूवात होत असून पहिल्याच दिवशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. पुणे शहरात आज विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुलाब, चॉकलेट तसंच विविध शालेय साहित्य देत त्यांच काही ठिकाणी औक्षणही करण्यात आलं. दोन महिन्यांपासून सामसूम असलेला शाळेचा परिसर मुलांच्या गर्दीनं पुन्हा गजबजून गेला आहे.
दोन महिन्यानंतर शाळामध्ये किलबिलाट : दोन महिन्यांपासून शांत असलेल्या शाळांमध्ये आज किलबिलाट पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि वर्गामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. नवीन शाळा, नवे बूट आणि गणवेशासह आईचा हात धरून मुलांनी शाळा गाठली. मे महिन्याच्या सुट्टीतील गमतीजमती नंतर नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी काही विद्यार्थी आनंदात शाळेत येऊन आपल्या मित्र मैत्रीणींना भेटले तर प्राथमिक शाळेतील लहान मुलं शाळेत येत असताना काहीसं आरडाओरडा करताना पाहायला मिळाले. अनेक विद्यार्थी आज पहिल्यांदाच शाळेत जाणार असल्यानं विद्यार्थी आणि पालकांमध्ये थोडीशी धाकधूक जाणवली.
पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यानिकेतन आणि पद्मश्री डॉ. वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यानिकेतन शाळेत सेवा मित्र मंडळाच्या वतीनं पोलिसांनी विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प आणि रेवडी देऊन स्वागत केलं. यावेळी विद्यार्थ्यांनी पोलीस काकांना नमस्कार करत शाळेत प्रवेश केला.
याबाबत प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखरे म्हणाल्या की, आजपासून महापालिकेच्या सर्व शाळा सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तकं देण्यात येणार आहेत. शाळांनी सर्व तयारी केली असून शिक्षकांना देखील याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्याच्या स्वागतासाठी शाळांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती. तसेच विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्युपुस्तके आणि शैक्षणिक साहित्य वाटण्यात आली.
हेही वाचा