सातारा Satara Lok Sabha Elections : सातारा लोकसभेच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यासाठी सातारा दौऱ्यार आलेल्या शरद पवार यांच्या समोर विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीचं कारण देत निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. दरम्यान, पाटण तालुक्याच्या आढाव्यावेळी खासदार पुत्र सारंग पाटील यांच्या उमेदवारीची केवळ एका कार्यकर्त्यानं मागणी केली, तर कराड उत्तरचं आमदार बाळासाहेब पाटील यांना सर्वाधिक पसंती मिळाल्याचं चित्र दिसून आलं.
तब्येतीच्या कारणावरून माघार : सातारा लोकसभा मतदार संघातील उमेदवारीवरून महायुतीत तसंच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात अद्याप पेच आहे. त्यामुळं दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचं नाव अद्याप निश्चित झालेलं नाही. या पार्श्वभूमीवर खुद्द शरद पवारांनी साताऱ्यात येऊन कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली. महायुतीतून खासदार उदयनराजेंना उमेदवारी मिळेल, असं संकेत मिळाल्यानंतर शरद पवार हे श्रीनिवास पाटील यांनाच रिंगणात उतरवतील, अशा अटकळी बांधल्या जात्त होत्या. परंतु, तब्येतीचं कारण देत खुद्द श्रीनिवास पाटील यांनीच माघार घेतली आहे.
पिता-पुत्राच्या उमेदवारीला दोन नेत्यांचा विरोध : खासदार श्रीनिवास पाटलांचे पुत्र सारंग पाटील या दोघांच्याही उमेदवारीला शरद पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा तीव्र विरोध होता. पाटण आणि कराडमधील मेळाव्याच्या बॅनवर देखील दोघांचे फोटो छापण्यात आले नव्हते. मात्र, शरद पवार त्यांची समजूत काढतील, असं वाटत होतं. मात्र, हा विरोध मावळण्याची चिन्हे नसल्याची खात्री झाल्यानंतर शरद पवार हेच आता मैदानात उतरतात का? याची उत्सुकता वाढली आहे.
शरद पवार मैदानात उतरणार? : कार्यकर्त्यांच्या आढाव्यात पाटण आणि कराड तालुक्यातून श्रीनिवास पाटील यांना मोठा विरोध झाला. कराड तालुक्यातील दक्षिण आणि उत्तरमधून आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळाल्याचं दिसून आलं. तसंच आ. शशिकांत शिंदे यांच्या नावाची कोरेगाव तालुक्यातून मागणी झाली. याचवेळी श्रीनिवास पाटील यांनी आपण माघार घेत असून नवीन उमेदवार देण्याची मागणी केली. शरद पवारांनीच निवडणूक लढवण्याची मागणी देखील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केली. त्यामुळं खुद्द शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? याची उत्सुकता वाढली आहे.
हे वाचलंत का :