सातारा Satara News : साताऱ्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या पथकानं बारबालांची छमछम सुरू असलेल्या पाचगणी टेन्ट हाऊस रिसॉर्टवर रविवारी (18 फेब्रुवारी) रात्री छापा मारून 12 बारबालांसह 48 जणांना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील खत, औषधं, बी-बियाणे विक्रेते आणि डीलर्सचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार रिसॉर्टवर धाड पडताच बारबालांसह डान्स करणारे पाच-सहा जण आपल्या आलिशान गाड्या सोडून पळून गेले. या कारवाईमुळं सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
दोन महिन्यात दुसरी कारवाई : सातारा पोलिसांनी जेव्हा रिसॉर्टवर धाड टाकली त्यावेळी बारबालांसह काही जण नाचत होते. धाड पडल्याचं लक्षात येताच पाच ते सहा जण घटनास्थळावर फरार झाले. पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत. यापूर्वी डिसेंबर 2023 मध्ये स्प्रिंग व्हॅली रिसॉर्टवर पाचगणी पोलिसांनी धाड टाकली होती. त्यावेळी बारबाला बीभत्स नृत्य करत होत्या. तर मद्यधुंद अवस्थेत नामांकित डॉक्टर त्यांच्यासोबत सापडले होते.
पाचगणीतील रिसॉर्ट्स झाली डान्सबार : पाचगणी परिसरात धनदांडग्यांनी अलिशान रिसॉर्ट बांधली आहेत. मुंबईतून बारबाला आणून रिसॉर्टमधील तळघरात रात्री त्यांना नाचवले जाते. उच्चभ्रू लोक, उद्योजक, नोकरदार बारबालांसोबत डान्स करत पैसे उधळतात. मोठ्या आवाजातील गाण्यांवर रात्री उशीरापर्यंत धिंगाणा सुरू असतो. त्यामुळे आजुबाजूचे रहिवाशीदेखील त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ही रिसॉर्ट्स आता डान्सबार बनली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
- गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू : पोलिसांनी धाड टाकून बारबालांसह 48 जणांना ताब्यात घेतलं आहे. या कारवाईची महाबळेश्वर, पाचगणी परिसरात जोरदार चर्चा आहे. हॉटेल मालक आणि मॅनेजरसह 20 लोकांवर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची चाहुल लागताच 16 जण पळून गेले होते. त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे. घटनास्थळावरुन 3 साउंड, 1मिक्सर, 2 माईक, 6 चारचाकी वाहने, 1 लाख 29,00 रूपये किमतीचे मोबाईल असा एकूण 68 लाख 38 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 12 बारबालांना सीआरपीसी 160 प्रमाणं नोटीस देवून सोडण्यात आले आहे.
हेही वाचा -