पुणे Sasoon Dean Letter : उंदीर चावल्यानं रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना ससून रुग्णालयात घडल्यानं मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी वैद्यकीय अधीक्षक दोषी असल्याचा ठपका ठेऊन त्यांची बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी अधीक्षक म्हणून यल्लाप्पा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र आता याच नियुक्तीला ससूनचे अधिष्ठता डॉक्टर विनायक काळे यांनी आक्षेप घेत बदली करण्याबाबत पत्र दिलं. त्यामुळे ससून रुग्णालयात नेमकं सुरू तरी आहे काय, याबाबत उलटसुलट चर्चा करण्यात येत आहेत.
अधिष्ठतांचं वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांना पत्र : ससून रुग्णालयाचे अधिष्ठता डॉक्टर विनायक काळे यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर यल्लाप्पा जाधव यांच्या बदलीची मागणी केली. गेल्या शुक्रवारीच डॉक्टर यल्लाप्पा जाधव यांची नियुक्ती ससूनमध्ये वैद्यकीय प्रमुख म्हणून करण्यात आली होती.
यल्लाप्पा जाधव वैद्यकीय अधीक्षक पदासाठी अपात्र : यल्लाप्पा जाधव वैद्यकीय अधीक्षक पदासाठी पात्र नसल्याचं ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर काळे यांनी शासनाला पत्र लिहिलं आहे. पत्रामधून डॉक्टर यल्लाप्पा जाधव यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आधी वैद्यकीय उपअधीक्षक असताना जाधव यांनी महिला सुरक्षा रक्षकाची छेड काढल्याचा आणि त्याप्रकरणी चौकशी होऊन त्यांना पदावरुन हटवल्याचा उल्लेख पत्रामध्ये करण्यात आला आहे. याआधी वैद्यकीय अधीक्षक पदाचा कार्यभार जाधव यांच्याकडं असताना त्यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं लाच घेताना अटक केली होती. तेव्हाही जाधव यांना पदावरून हटवण्यात आले होते. डॉक्टर जाधव वैद्यकीय अधीक्षक पदासाठीचे पात्रता निकष पूर्ण करत नसल्याचा डॉक्टर काळे यांनी या पत्रात नमूद केलं आहे.
अधीक्षक पदासाठी किमान पाच वर्ष प्राध्यापकाचा अनुभव : अधीक्षक पदासाठी किमान पाच वर्ष प्राध्यापक म्हणून काम केलेलं असणं आवश्यक आहे. मात्र जाधव यांच्याकडं तो अनुभव नाही. लवकरच भारतीय आयुर्वेद ज्ञान आयोगाकडून ससूनचे इन्स्पेक्शन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर जाधव यांची नियुक्ती अडचणीची ठरते. त्यामुळे डॉक्टर काळे यांनी जाधव यांना बदलण्याची मागणी केली आहे. ससूनमध्ये रोज हजारो रुग्ण राज्यासह देशभरातून येतात. त्यामुळे अशा महत्त्वाच्या ठिकाणची नियुक्ती सतत बदलत राहणं हे रुग्णाच्या दृष्टीनं घातक आहे.
हेही वाचा :