मुंबई Eknath Shinde Photo With Gangster : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल, (5 फेब्रुवारी) एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा गुंड हेमंत दाभेकरसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली. संजय राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये, महाराष्ट्रात गुंडांचं राज्य सुरू असल्याचा आरोप केला होता.
एकनाथ शिंदेंचा फोटो शेअर केला : यानंतर आज त्यांनी आणखी एक फोटो शेअर केला. हा फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आहे. या फोटोमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत गुंड निलेश घायवळ असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. निलेश घायवळ पुण्याच्या कोथरुड भागातील गुंड असून, त्याच्यावर 23 ते 24 गुन्हे दाखल आहेत. संजय राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांवरही टीका केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत : "महाराष्ट्रात गुंडा राज. गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य! हे महाशय कोण आहेत? त्यांचे नेमके कर्तुत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा. कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते. आज ही काय अवस्था करुन ठेवली आहे मोदी शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीने", अशी पोस्ट संजय राऊत यांनी केली.
रोज एक फोटो ट्वीट करणार : मी यापुढे रोज गुंडांची माहिती देत राहील, असं संजय राऊत म्हणाले. मी माझ्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांना टॅग केलंय, अशी माहिती त्यांनी दिली. "जामिनावर बाहेर आलेल्या गुंडांना भेटून मुख्यमंत्री नेमकं काय करत आहेत? मुख्यमंत्र्यांचे चिरंजीवही गुंडांना भेटतात. आता मी यापुढे रोज एक फोटो ट्वीट करणार आहे", असं संजय राऊत यांनी सांगितलं.
हे वाचलंत का :