मुंबई - Chhagan Bhujbal and Shiv Sena : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. छगन भुजबळ व शिवसेनेचा कुठलाही संवाद, गुफ्तगू नसून ते शिवसेनेमध्ये येणार आहेत, या केवळ अफवा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. राऊत मुंबईत बोलत होते.
भुजबळ यांच्याशी कुठलाही राजकीय संवाद नाही
याप्रसंगी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "छगन भुजबळ शिवसेनेमध्ये येणार या बातमीमध्ये कुठलंही तथ्य नाही. या केवळ अफवा आहेत. छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर आहेत, परंतु ते कुठल्या वाटेने येत आहेत ती वाट आम्हाला अद्याप दिसली नाही. छगन भुजबळ पूर्वी शिवसेनेमध्ये होते. तेव्हा ते फार मोठे नेते होते. जर का ते कुठल्याही एका पार्टीमध्ये राहिले असते तर ते नक्की मुख्यमंत्री झाले असते."
"छगन भुजबळ शिवसेनेत होते. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. नंतर शरद पवार यांच्या पक्षात गेले व त्यांच्याबरोबर बराच काळ होते.आता ते अजित पवार गटा बरोबर आहे, असा त्यांचा मोठा प्रवास आहे आणि त्यांच्या या प्रवासात शिवसेना फार मागे राहिली आहे. पण राजकीय प्रवासात शिवसेना फार पुढे गेली आहे. आमचा छगन भुजबळ यांच्याशी कुठल्याही प्रकारचा राजकीय संवाद झालेला नाही आणि होण्याची शक्यताही नाही", असा ठाम विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच छगन भुजबळ यांच्या भूमिकेशी शिवसेनेची भूमिका कधीच मेळ खाणार नाही. अशा प्रकारच्या बातम्या पेरून, अफवा पसरवून महाराष्ट्रात गोंधळ उडवायचा प्रयत्न आहे, या पलीकडे आम्ही या बातमीला काही महत्त्व देत नाही, असेही राऊत म्हणाले.
जे सोडून गेले त्यांची चिंता आम्ही का करावी
संजय राऊत पुढे म्हणाले की, "शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. ज्यांनी शिवसेना फोडली, महाराष्ट्राच्या दुश्मनांशी हात मिळवणी केली, त्यांच्याशी आमचा कुठलाही संवाद राहिलेला नाही, राहणारही नाही. त्यांच्याशिवाय शिवसेना पुढे गेलेली आहे. हजारो - लाखो निष्ठावंत शिवसैनिक यांच्या मदतीने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आजची शिवसेना पुढे गेली आहे. आमचे ९ खासदार आम्ही निवडून आणले आहेत. जे सोडून गेले आहेत त्यांची चिंता आम्ही का करावी. आज शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिवस आहे. हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना ५८ वर्षांपूर्वी तयार केली त्या अशा गद्दारांना बरोबर घेण्यासाठी नाही. म्हणून आता हा आला, तो आला यावर आमच्याकडे चर्चा नाही," असेही राऊत म्हणाले.
हेही वाचा -
सलमान खान स्टारर 'सिकंदर'च्या शूटिंगला सुरुवात, सेटवरील फोटो व्हायरल - SALMAN KHAN
बिग बॉसच्या घरात अनिल कपूरला पाहायचे आहेत 'हे' बॉलिवूडचे कलाकार! - Anil Kapoor host Big Boss OTT
राहुल मोदीनं चोरलं श्रद्धा कपूरचं हृदय? शक्ती कपूरच्या मुलीची 'उडलीय' झोप!! - Shraddha Kapoor