मुंबई Sanjay Raut News: फोटोग्राफर मुख्यमंत्री झाला की प्रॉब्लेम होतो, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. त्या टीकेला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्र दिलं आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र राहिले नाहीत, असा टोला लगावत त्यांनी फडणवीसांचे चांगलेच कान टोचले.
महाराष्ट्राचे चित्र उत्तम काढलं: मुंबईत एका कार्यक्रमामध्ये बोलताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत फोटोग्राफर मुख्यमंत्री झाला तर प्रॉब्लेम होतो, असा टोला लगावला होता. फडणवीस यांच्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणाले की, " उत्तम फोटोग्राफर असला तर महाराष्ट्राचे चित्र उत्तम काढलं जाते. उद्धव ठाकरे यांनी ते चित्र उत्तम काढलं आहे. ते चित्र इतकं विदारक आहे. म्हणून लोकसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला. यामुळे त्यांना अडचण होणारच आहे," असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
सरकारचं आयुष्य दोन ते तीन महिने: महायुतीच्या सरकार बद्दल बोलताना संजय राऊत यांनी पुन्हा टीका केली आहे. ते म्हणाले की, " या देशाचं संविधान धोक्यात आहे. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे सरकार आहे. घटनाबाह्य पद्धतीने बहुमत चाचणी घेतली. प्रत्येकाने बेकायदेशीर आणि घटनाबाह्य अशी कृती केली. त्यातून हे बेकायदेशीर सरकार जन्माला आलं. ते बेकायदेशीर पद्धतीनं ऑक्सिजनवर टिकवलं आहे. हे सरकार बनवताना पंतप्रधान, गृहमंत्री, राज्यपाल, न्यायालय, विधानसभा अध्यक्ष या प्रत्येकाने घटनाबाह्य कृती केली. हे फसवणुकीने निर्माण झालेलं सरकार महाराष्ट्र राज्याच्या छाताडावर बसलं आहे. या सरकारचं आयुष्य दोन ते तीन महिने आहे. लोकसभेत जनतेने नाकारलं. विधानसभेत सुद्धा दारुण पराभव होणार आहे. मिंदे यांनी कुठला उठाव केला? चोरांचा उठाव, दरोडेखोरांचा उठाव, असे कधी होते का? हिम्मत होती तर स्वतःचा पक्ष स्थापन करून स्वतःच्या चिन्हावर निवडणुक लढवायला हवी होती."
जनतेच्या पैशांचा उपयोग मतांसाठी: अर्थसंकल्पात महायुती सरकारने पाडलेल्या घोषणांच्या पावसावर बोलताना संजय राऊत म्हणाले, " सरकारी जनतेच्या पैशानं लोकांना भुलवण्याचा आणि मतं विकत घेण्याचा हा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणुकीत थेट मतदारांपर्यंत पैसे पोहोचवून त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेच्या पैशातून थेट मतं विकत घेण्याचा हा प्रयत्न आहे. ही लाच आहे," असंही संजय राऊत म्हणाले आहेत. पुढे खासदार राऊत म्हणाले, " नितीश कुमार हे पहिल्याचे नितीश कुमार राहिले नाहीत. ते जयप्रकाश नारायण यांच्या खूप जवळचे राहिले होते. परंतु आता नितीश कुमार यांची तब्येत, मानसिकता खूप बिघडली आहे. जर त्यांची तब्येत ठीक असती तर ते मोदींसोबत गेले नसते. मोदी आणि शाह त्यांचा गैरवापर करत आहेत"
हेही वाचा